लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल : कळंबोली येथील सेल कंपनीमध्ये कामगार आणि ठेकेदार यांच्यात मागील दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. लोखंडी माल उचलण्यासाठी लोखंडी चुंबक (मायजॅक क्रेन) सेल कंपनीने आणल्याने माथाडी कामगारांचा याला विरोध आहे. मराठी कामगार सेनेच्या प्रतिनिधींसह या संघटनेच्या कामगारांनी बुधवारी सेल कंपनीतील मायजॅक क्रेनचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी वारंवार सांगूनही कामगार व त्यांच्या प्रतिनिधींनी जमावबंदीचा नियम मोडल्यामुळे कामगार नेते महेश जाधव व इतर ७० कामगारांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कळंबोली येथील सेल कंपनीमध्ये लोखंडी मालाची आवक जावक होते. या लोखंडी मालाची हाताळणीसाठी शेकडो माथाडी कामगार येथे अनेक वर्षांपासून काम करतात. मायजॅक क्रेन आल्यापासून या माथाडी कामगारांचे वेतन ठेकेदाराकडून कमी मिळत असल्याचा आरोप करुन अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार संघटनेतून फारकत घेत अनेक माथाडी कामगारांनी वेतनवाढीच्या आशेने महेश जाधव यांचे नेतृत्व स्वीकारले. महेश जाधव यांचे व राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचे सेल कंपनीच्या माथाडी कामगारांच्या कारणावरुन वाद झाल्याने जाधव यांच्यावर मुंबईला मनसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली.

आणखी वाचा-उरण नगरपरिषदेची गॅसदाहिनी महिनाभरात सुरू होणार

काही दिवसांपूर्वी जाधव यांनी मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सेल कंपनीचे प्रकरण चर्चेत आले. पोलिसांनी जाधव यांच्याविरोधात दाखल केलेल्या फौजदारी कारवाईमध्ये कळंबोलीचे पोलीस कामगार नेते जाधव यांना बुधवारी सेल कंपनीमध्ये मायजॅक क्रेनचे काम ज्या कामगारांना करायचे आहे अशा कामगारांना करू द्या इतर कामगारांनी पोलिसांनी लागू केलेला जमाव बंदीचा नियम मोडल्यास कारवाई करू असा इशारा दिला. या इशाऱ्याला न जुमानल्याने ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been registered against the workers who obstructed the work of the cell company mrj