लोकसत्ता टीम
पनवेल: वावंजा येथे एन के कॅस्टल हा गृहप्रकल्प उभारणारे निलीपारंबिल कराप्पन भुपेशबाबू यांच्यावर एका गुंतवणूकदार महिलेने २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. संबंधित गुंतवणूकदार महिलेच्या पतीने दिल्ली येथील पोलीस उपायुक्त या पदावरुन स्वेच्छानिवृत्त घेतली आहे.
गुंतवणूकदार महिलेने २०१७ विकसक निलीपारंबिल कराप्पन भुपेशबाबू यांच्या आश्वासनानंतर वावंजा येथे उभारत असलेल्या एन.के कॅस्टल या गृहप्रकल्पाच्या योजनेमध्ये ९ लाख ५३ हजार ८७५ रुपये गुंतविले होते. ही रक्कम एक रकमी अनामत ठेव म्हणून ठेवण्यात येईल व त्या रकमेवर १६ टक्के व्याज मिळणार असे सांगण्यात आले होते.व्याजासह या रकमेचा परतावा ३१ मार्च २०१८ पर्यंत देऊ असेही सांगीतले होते. या गुंतवणुक व्यवहारात तारण म्हणून एन के कॅस्टल या गृहप्रकल्पातील बालसम इमारतीमधील ४०८ चौरस फुटाची सदनिका ज्याची किंमत १८ लाख २५ हजार रुपये आहे हे निश्चित झाले होते. याबाबतचा सामंजस्य करार गुंतवणुकदार महिला व विकासक यांच्यात झाला होता.
आणखी वाचा-पनवेल: दर्शनाला जात असताना मंगळसूत्र हिसकावले
परताव्याची रक्कम आणि ठरलेले व्याजाची रक्कम न दिल्याने गुंतवणूकदार महिला भूपेशबाबू यांना वारंवार फोनवरुन संपर्क साधत होते. मात्र ते टाळत असल्याचे फौजदारी तक्रारीत महिलेने म्हटले आहे. अखेर संशय बळावल्याने भुपेशबाबु यांच्या गृहप्रकल्पाची माहिती घेतल्यावर संबंधित प्रकल्पाला शासनाकडील अधिकृत परवानग्या नसल्याचे समजले. तसेच भुपेशबाबू यांच्याकडे भारतीय रिझर्व बँक यांचेकडील गुंतवणूक स्वीकारण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समजले आहे. भूपेशबाबू यांनी संबंधित गृहप्रकल्पातील संबंधित सदनिकेचे अलॉटमेंट पत्र गुंतवणूकदार महिलेला दिले. मात्र सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यामुळे गुंतवणूकदार महिला व त्यांच्या पतीने पोलीस ठाणे गाठले.