नवी मुंबई : पोलीस मुख्यालयात कार्यरत असताना रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पावती न देता दंडवसुली केल्याबाबत घरगुती गॅस पोहोचवणाऱ्या वाहनचालकाने दिलेल्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा…महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन शुक्रवारी
स्वप्निल देवरे, विशाल दखने आणि सचिन बोरकर अशी यातील आरोपींची नावे आहेत. हे तिन्ही पोलीस कर्मचारी असून पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. उरण फाटा ते उरण मार्गावर गस्त घालण्याच्या नावाखाली त्यांनी एका टेम्पो चालक विक्रम खोत यांना अडवले. या टेम्पोमध्ये घरगुती गॅस सिलिंडर होते, जे ग्राहकांना पोहोचवण्याचे काम फिर्यादी करत होते. खोत यांना अडवून तिन्ही पोलिसांनी त्यांच्याकडील वाहन चालवण्याचा परवाना घेतला तसेच पीयूसी आणि वाहन पासिंग तारीख उलटून गेली असे सांगत त्यांना नेरुळ सेक्टर १९ येथे नेले. त्या ठिकाणी तीन हजार रुपयांचा दंड भरा असे सांगत तीन हजार रुपये घेतले, मात्र त्याची कुठलीही पावती दिली नाही. त्यामुळे खोत यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत नेरुळ पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.