लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल : पनवेल शहरातील ओरीयन मॉलमधील पीव्हीआर आयनॉक्स या सिनेमागृहातील वातानुकूलीत यंत्रणा बुधवारी दिड ते अडीच वाजेपर्यंत बंद असल्याने जयभीम पॅंथर हा सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना प्रचंड गरमीचा सामना करावा लागला. याच मॉलमधील इतर सिनेमागृहातील वातानुकूलीत यंत्रणा व्यवस्थित सुरू होती. मात्र पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या व्यवस्थापनाने जयभीम पॅंथर हा सिनेमा सुरू असताना तेथील वातानुकूलीत यंत्रणेकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या प्रेक्षक महिलेने थेट पीव्हीआर आयनॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक अजय बीजली यांच्यासह व्यवस्थापनातील मुख्य पाच अधिका-यांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती(अ.प्र.) सूधारणा अधिनियम २०१५ कलम ३ (१)(झेडसी) ३(१) (आर) (यु), ३(२)(व्ही)(ए), सह नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ कलम ७(१) (अ) (ब) (क)(ड),१० सह भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जयभीम पॅंथर हा सिनेमा पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेण्यासाठी प्रेक्षकांनी आयनॉक्स सिनेमागृहाची तिकीट खऱेदी केले होते. मात्र याच मॉलमधील आयनॉक्स कंपनीच्या इतर सिनेमागृहात व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जयभीम पॅंथर ज्या सिनेमागृहात प्रदर्षित केला तेथे आयनॉक्स व्यवस्थापनाने खोडसाळ व भेदभावाने सिनेमागृहातील वातानुकूलीत यंत्रणा बंद ठेवल्याबाबत महिला प्रेक्षकानी तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
आयनॉक्स सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांनी प्रेक्षकांसोबत उद्धट वर्तन केल्यामुळे संतापलेल्या प्रेक्षकांनी थेट पोलिसांत गुन्हा नोंदवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अजय बीजली यांच्यासोबत आयनॉक्सचे सह व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, आयनॉक्सचे पनवेलचे चालक, मालक व व्यवस्थापक यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.