अंतर्गत रस्त्यांवर ट्रक, टँकरची बेकायदा पार्किंग; रहिवासी मेटाकुटीला
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सीबीडीमधील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे. सीबीडी सेक्टर ३, ४ आणि ५ येथील रहिवासी संकुलांच्यालगत असणाऱ्या आणि महापालिकेने निर्माण केलेल्या अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जात असल्याने सीबीडीमधील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.
शहरातील अंतर्गत रस्ते हे हलक्या वाहनांसाठी असताना अवजड वाहनेदेखील अंतर्गत रस्त्यावर येत असल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था होत आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सीबीडी सेक्टर ३, ४ व ५ अवजड वाहनांचे वाहनचालक वाहने पार्किंग करून सकाळच्या वेळेला रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या पदपथांचा आडोसा घेऊन नैसर्गिक विधी करतात. यामुळे या ठिकाणी पदपथांचा नागरिकांकडून वापर करण्यात येत नाही. सकाळच्या वेळी महिला व महाविद्यालयीन तरुणीला या ठिकाणाहून प्रवास करत असताना नाहक त्रास सहन करावा लागतो. सीबीडी येथील अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे अजजड वाहने पार्क करणाऱ्यांवर राजकीय स्थानिक नेत्यांचा वरदरस्त असल्याची येथील नागरिकांची तक्रार असून तसेच वाहतूक पोलीसांचेदेखील या अवजड वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सीबीडीमधील अंतर्गत रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या अवजड वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यासंबधीचे पत्र धनाजी खराडे यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहे.
सीबीडी रहिवासी संकुलाचे ‘अवजड’ दुखणे!
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सीबीडीमधील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-01-2016 at 07:43 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbd residents faceing lots of problems due to heavy vehicle parking