आमदार गणेश नाईकांनी आजच्या पालकांच्या बैठकीत दिले आश्वासन ,आंदोलन न करण्याचे आवाहन
नवी मुंबई महापालिकेत पालिकेच्या सीबीएसई शाळांचा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा नियोजन शून्य व भोंगळ कारभार अगदी उघडपणे समोर आला असून पालकांनी दोन दिवस शाळेत नो एन्ट्री आंदोलन करत शाळाच भरवू दिली नाही. तर सोमवारी पालक व विद्यार्थ्यांसमोर पालिका आयुक्त कार्यालयातच शाळा भरवण्याचा इशारा पालकांनी केला आहे. परंतू रविवारी आमदार गणेश नाईक यांनी कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेच्या पालकांसमवेत बैठक घेऊन सोमवारी सकाळी शाळेत ३२ शिक्षक एका संस्थेद्वारे रुजू होणार असल्याची माहिती देत आंदोलन न करण्याचे आवाहन पालकांना केले आहे. तर दुसरीकडे पालकांनी सोमवारी सकाळी शाळेत नव्याने ३२ शिक्षक रुजू झाले नाहीत तर आंदोलन करणारच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे आता कोपरखैरणे शाळेतील शिक्षकांच्या अभावी सुरु झालेला गोंधळ उद्या संपणार की आणखी तेढ निर्माण होणार याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईकरांनो खुशखबर.. मोरबे धरणातही पहिल्याच दिवशी ९० मिमी पाऊस!
गेल्यावर्षभरापासून शिक्षक मिळतील अशी आश्वासने पालिका प्रशासनाकडून पालकांना दिली जात होती. परंतू नव्या वर्षातही शिक्षक मिळाले नसल्याने पालक संतप्त झाले असून शिक्षकांविना किती दिवस मुलांचे शैक्षणिक करणार असा प्रश्न पालिका शिक्षण विभागाला विचारत शाळाच भरु न देण्यासाठी दोन दिवस शाळाबंद आंदोलन केले आहे.कोपरखैरणे येथील पालिकेच्या सीबीएसई शाळेत गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचा तुटवडा जाणवत आहे. १५ जूनपासून कोपरखैरणे सीबीएसई शाळेत आवश्यक शिक्षक संख्येअभावी सोमवारपासून शाळा एक दिवसाआड चालवण्याची नामुष्की ओढवली होती. कशीबशी शाळा चालवण्यासाठी पहिली दुसरीचे वर्ग सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी तर तिसरी ते पाचवी चे वर्ग मंगळवार गुरुवार शनिवारी भरवण्यात आले होते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : पावसाचा दमदार श्रीगणेशा, १२ तासात बेलापूरमध्ये १०३ मिलिमीटर पावसाची नोंद
सहावीचा वर्ग मात्र दररोज शाळेत बोलवण्यात येत होता. परंतू वारंवार मागणी करुनही नव्या वर्षातही आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान शाळा करत आहे त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान खपवून घेतले जाणार नसल्याने पालक आक्रमक झाले आहेत. गुरुवारी सकाळी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच रोखले त्यामुळे गुरुवारी शाळाच भरवू दिली नाही तर सोमवारपर्यंत शाळाच भरवू न देण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.तसेच पालिका मुख्यालयातच सोमवारी मुलांसमवेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने त्तापुरते ६ शिक्षक नेमले असले तरी शाळेत अजूनही ३० पेक्षा अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे.त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. तर आज आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, तसेच माजी आमदार संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक व स्थानिक माजी लोकप्रतिनिधी व पालिकेचे उपायुक्त दत्तात्रय घनवट उपस्थित होते.यावेळी आमदार नाईक यांनी सोमवारी सकाळी शाळेत एका संस्थेमार्फत ३२ शिक्षक पाठवण्यात येणार असून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पालकांनी शिक्षक मिळवण्यासाठी सुरु केलेले आंदोलनाचे नक्की काय होणार हे सोमवारी सकाळीच स्पष्ट होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून आमच्या मुलांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत. १३७५ विद्यार्थी असताना फक्त ५ शिक्षक व एक मुख्याध्यापक असे चित्र असून आमच्या मुलांना शिक्षक द्या यासाठी सोमवारी पालिकेतच मुलांसमवेत शाळा भरवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी ३२ शिक्षक शाळेत येतील असे सांगीतले आहे. परंतू उद्या सकाळी शिक्षक शाळेत आले नाही तर मुलांना शाळेत जाऊ दिले जाणार नसून पालिकेत शाळा भरवण्यावर आम्ही ठाम आहोत. रेणूका म्हात्रे, पालक
आज आमदार गणेश नाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरखैरणेतील शाळेतील पालकांसमवेत बैठक झाली असून सोमवारी सकाळी एका सामाजिक संस्थेद्वारे अत्यावश्यक बाब म्हणून ३२ शिक्षक पाठवण्यात येणार आहेत.पालकांना आंदोलन मागे घेण्याचे सांगण्यात आले आहे. दत्तात्रय घनवट,उपायुक्त शिक्षण विभाग