गणेशोत्सवानिमित्त उरण तालुका व शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी तसेच या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस सज्ज झाले आहेत. त्यासाठी उरण शहरातील मुख्य ठिकाणी तसेच तालुक्यातील मोक्याच्या जागी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी आदी सण साजरे केले जाणार आहेत. या कालावधीत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. त्याच वेळी काही समाजकंटक या गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. वाढती लोकसंख्या व पोलिसांचे कमी असलेले प्रमाण यामुळे सर्वत्र लक्ष ठेवणे पोलीस यंत्रणेला शक्य होत नाही. त्यासाठीच उरण शहरातील महत्त्वाचे नाके, रस्ते, परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उरण तालुक्याच्या हद्दीत प्रवेश होत असलेल्या ठिकाणीही पोलिसांनी सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे. सध्या असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. याकरिता उरणच्या व्यापारी संघटना सहकार्य करीत आहे. सध्या उरण हे मुंबईपासून जलमार्गाने जवळ असल्याने तालुक्यातील जलमार्गावरही पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा