नवी मुंबई : बेलापूर येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये नवी मुंबई शहर, पनवेल महापालिका क्षेत्र यामधील सर्वच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण असणार आहे. हा नियंत्रण कक्ष उभारण्याच्या कामाला वेग आला असून पनवेल महापालिका या नियंत्रण कक्षाचे बांधकाम करणार आहे तर नवी मुंबई महापालिका या कक्षातील अंतर्गत साहित्याचा पुरवठा करणार आहे. दोन्ही महापालिका या नियंत्रण कक्षासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करणार आहेत.

या नियंत्रण कक्षामध्ये डेटा सेंटर आणि कमांड सेंटरची तरतूद नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी केली आहे. नवी मुंबईत होणाऱ्या रस्त्यावरील गुन्हेगारांना या नियंत्रण कक्षातून पकडण्यात मोठी मदत भविष्यातील तपास यंत्रणेला मिळणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला विस्ताराचे वेध लागले असले तरी सुमारे ३५ लाख लोकसंख्येच्या पोलीस आयुक्तालयात सुरक्षेसाठी अवघे साडेपाच हजार पोलीस तैनात आहेत. आधुनिक युगातील गुन्हेगारसुद्धा आधुनिक पद्धत अवलंबत असल्याने नवी मुंबई सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे पसरुन पोलीस आयुक्तालयाच्या एका कार्यालयातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यासाठी तिसरा डोळ्याला अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे. मागील अनेक वर्षात स्वतःचे हक्काचे सीसीटीव्ही नियंत्रण केंद्र नवी मुंबई पोलीस उभारु शकले नाहीत.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी हक्काचे नियंत्रण कक्ष सुरू करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमोर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, डेटासेंटर व कांड सेंटरची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये संयुक्तपणे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोरील उजव्या बाजूच्या मोकळ्या भूखंडावर सुमारे साडेपाच हजार चौरस फुटाची एक मजली इमारत उभारुन त्यामध्ये अद्यायावत नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आरेखन बनविण्यात आले.

या नियंत्रण कक्षाची एक मजली इमारत पनवेल महापालिका बांधून देणार आहे. या बांधकामासाठी पनवेल महापालिका सूमारे २ कोटी १३ लाख ९८ हजार रुपयांचा खर्च कऱणार असून या कामाची निविदा पनवेल महापालिकेने शनिवारी ( ता.१५) जाहीर केली. तसेच ही इमारत बांधल्यानंतर या इमारतीमध्ये लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसाठी नवी मुंबई महापालिकेने साडेपाच कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शविल्यामुळे पुढील काही महिन्यात हे डेटासेंटर उभे राहील यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

निम्मेच कॅमेरे सुरू

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारल्याने नवी मुंबई शहर सर्वात सुरक्षित शहर अशी घोषणा केली होती. मात्र नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सध्या याच कॅमेरांची देखभालीसाठीच्या सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

* शहरात महापालिकेने शेकडो कोटी रुपये खर्च करुन १३०० हून अधिक सीसीटिव्ही कॅमेरे लावले. याच कॅमेरांच्या आधारावर सध्या नवी मुंबई पोलीसांचा तपास अवलंबून असतो. परंतु धक्कादायक बाब म्हणजे यामधील निम्मेच कॅमेरे सुरू असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांना वेळोवेळी रस्त्यावरील दुकानदार, हॉटेल मालकांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अवलंबून रहावे लागते.

या केंद्रातून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे पोलीसांच्या नियंत्रणाखाली येतील. तसेच येथे डेटासेंटर व कमांड सेंटर असल्याने २४ तास पोलिसांची त्यावर नजर असेल. पुढील काही महिन्यात हे केंद्र सुरू करण्यासाठीचे नवी मुंबई पोलीस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. – अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग

Story img Loader