उरण : गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेला याचा फायदा होणार आहे. यासाठी उरण नगर परिषदेच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात येणार आहे. जुलै महिनाभरात उरण- पनवेल या रहदारीच्या मार्गावर झालेल्या हत्याकांडानंतर उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर, मागील अनेक महिन्यांपासून शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
मुंबई आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या अटल सेतू आणि रेल्वे सेवेमुळे हे अंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांवर आले आहे. त्यातच, उरण तालुक्यातील वाढते व्यवसाय, कंटेनर यार्ड्स आणि बंदर यामुळे हजारो रहिवासी हे दररोज येजा करीत आहेत. यामुळे, उरण परिसरातील बदलती रहिवाशी संख्या वाढली असून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये देखील वाढ झाली आहे. बाजारात होणारी गर्दी, शाळा, महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा उपयोग होणार आहे.
हे ही वाचा…Mumbai Fire : मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू
दरम्यान, उरण शहरातील बाजारपेठ ही तालुक्यातील व्यावसायिक आणि रहिवाशांसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने दररोज हजारो रहिवासी हे बाजारहाटासाठी येत असतात. त्यातच, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही हे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने ‘तिसरा डोळा’ बंद होता. तसेच, गेल्या वर्षभरापूर्वी उरण शहर आणि परिसरात सुमारे ८५ सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव पोलीसांकडून देण्यात आला होता. मात्र आता उरण नगर परिषदेने ही जबाबदारी स्वीकारली असून लवकरच १०० सीसीटीव्ही कार्यान्वित होणार आहेत.
उरण शहरातील बंद सीसीटीव्ही सुरू करून शहरातील हालचालीवर नियंत्रण ठेण्यासाठी कक्ष उभारण्यात येणार असून यासाठी नगरपरिषदकडून अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू आहे.
- जितेंद्र मिसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,उरण पोलीस ठाणे</li>
उरणच्या शहरातील मोक्याच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही उरण नगर परिषदेच्या वतीने बसविण्यात येणार आहेत. या कामाची सुरुवात झाली आहे.
- समीर जाधव , मुख्याधिकारी, उरण नगर परिषद