नवी मुंबई : दोन वर्षांपासून शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले असले तरी पूर्ण क्षमतेने त्याचा वापर करता येत नाही अशी स्थिती आहे. एकूण एक हजार ५४३ पैकी काही ठिकाणी सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध होते तर काही ठिकाणी होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अद्याप संबंधित ठेकेदाराचे ६० कोटी रुपयांचे देयक रोखले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येण्यासाठी तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात कार्यादेश मिळाल्यानंतर जवळजवळ दोन वर्षे झाल्यानंतरही एक हजार ५४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु, पूर्ण क्षमतेने कॅमेरे सुरू नसल्याचा दावा पालिकेने केलो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कामांबरोबरच पालिकेच्या पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुमचे उद्घाटन केले. पण अद्याप संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येत नसल्याने पालिकेने ठेकेदाराच्या कामाचे देयकही रोखले आहे.

हेही वाचा…उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा, वीकेंडला रुचकर पोपटीचे बेत

पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण नवी मुंबई शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचे लक्ष ठेवले होते. परंतू अंतिम मुदतवाढ संपूनही अद्याप काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पालिकेने संबंधित कामाचा ठेका रद्द का करु नये अशी नोटीस ठेकेदाराला बजावली होती.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आवश्यक ‘कनेक्टीव्हीटी’साठी विविध शासकीय आस्थापनांकडून परवानगीच दिली जात नाही. विविध ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळण्यात अडचणी येतात, अशी ओरड ठेकेदाराकडून करण्यात येत होती. ‘कनेक्टीव्हीटी’ मिळाल्यानंतरही संपूर्ण शहर पूर्ण क्षमतेने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करता येत नसल्याने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा दावा पालिकेने केला. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली त्यानंतरही हे काम पूर्णत्वास आले नाही. आता सीसीटीव्ही कॅमेरे लागले परंतू त्यातील अनेक कॅमेरे सुरु नसल्याचा प्रकार समोर येत आहे. हे काम मे. टाटा कंपनीला देण्यात आले होते. कॅमेरे लागले पण पूर्ण क्षमतेने कॅमेरे सुरु नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा…निवडणुकीनंतर कामांना गती, नागरी सुविधा कामांच्या निविदांसाठी नवी मुंबई महापालिकेची तांत्रिक समिती

पोलीस मुख्यालयातही व्यवस्था

शहरातील काही प्रमाणात सुरु असलेल्या सीसीटीव्हींमुळे अनेक गुन्हे उघडकीस येत आहे. पोलीसांनी आतापर्यंत सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.पालिका मुख्यालयाप्रमाणे पोलीस मुख्यालयातही सीसीटीव्ही पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात वाहतुकीच्यादृष्टीने तसेच सुरक्षेच्या व तपासाच्यादृष्टीने सीसीटीव्हीची नजर महत्वाची आहे.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले पण त्यात अनेक ठिकाणी कॅमेरेच सुरु नसल्याचे निदर्शनास आले आहे. नियमानुसार काम पूर्ण केले नसल्यामुळे त्याच्या ठेक्याची पूर्ण रक्कमही दिली नाही. याबाबत आयुक्तांच्या निर्देशानुसार ठेकेदारावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. शिरीष आरदवाड, अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv installation completed two years ago but not fully utilized in the city sud 02