नवी मुंबई : करोना काळानंतर शंभर टक्के पूर्ण मुक्त रंगपंचमी यंदा साजरी होत आहे. रंगपंचमी होळीनंतर सहा दिवसांनी असली तरी राज्यातील अनेक ठिकाणांप्रमाणे धुरवडलाच रंगपंचमी येथेही साजरी केली जाते. रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस सतर्क असून, नऊशेच्या आसपास पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यात परिमंडळ एकमध्ये चारशे, तर अन्य परिमंडळ दोनमध्ये तैनात आहेत. यात सुमारे ३० ते ३५ टक्के महिला पोलिसांचा समावेश आहे.
नवी मुंबईला जातीय दंगलीचा कुठलाही इतिहास नसून, सर्व धर्मांचे लोक आपापले सण उत्साहात साजरे करतात. तरीही रंगाचा बेरंग नको म्हणून दोन्ही परिमंडळमध्ये अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सकारात्मक बाब म्हणजे, नवी मुंबईत सर्वधर्मीय लोक उत्साहात सण साजरा करतात. सोसायट्यांमध्ये रंगपंचमीला दुपारनंतर जेवणाचे बेत ठरलेलेच असतात. त्यात रंगपंचमीशी निगडीत गाणी, नाच हा ठरलेलाच असतो. यंदा दहावीची परीक्षा सुरू असल्याने त्यात उद्या (बुधवारी) हिंदीचा पेपर असल्याने दहावीची बच्चे मंडळी मात्र सकाळी थोडा वेळ रंग खेळून लवकरच पुन्हा अभ्यासाला लागलेली आहेत.
हेही वाचा – “मोदींना हरवणं येड्या गबाळ्याचं काम नाही,” रामदास आठवले यांचं विधान
रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः आपाल्या क्षेत्रात सतर्क असून, महिला पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय मद्यपी वाहन चालक आणि धूम स्टाईलने दुचाकी पळवणाऱ्यांवरही नजर ठेवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही, असे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे म्हणाले.