नवी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गावरील १४ रेल्वे स्थानके हस्तांतरित करून घेण्यास मध्य रेल्वे प्रशासन गेले वर्षभर चालढकलपणा करीत असल्याने प्रवाशांच्या समस्या कायम आहेत. या स्थानकांची दुरुस्ती सिडकोने करून द्यावी असा मध्य रेल्वेचा प्रस्ताव असून रेल्वे सेवा देणे ही मध्य रेल्वेची जबाबदारी असल्याने हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, असे सिडकोचे स्पष्ट केले आहे. डागडुजी केल्यानंतरही मध्य रेल्वेने ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे दोन प्रशासनांच्या वादात सुरक्षा, स्वच्छता, दुरुस्ती या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
नवी मुंबईच्या सर्वागीण विकासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय असल्याने सिडकोने ६७ टक्के खर्च करून जुलै १९९३ मध्ये मानखुर्द-वाशी ही नवी मुंबईतील पहिली रेल्वे सेवा सुरू केली. त्यानंतर ठाणे-तुर्भे ही मध्य रेल्वे मार्गावरील सेवा जून २००२ मध्ये विस्तारित करण्यात आली. सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्च करून सिडकोने नवी मुंबईत रेल्वेचे जाळे विणले असून आता नेरुळ-उरण या तिसऱ्या महत्त्वाकांक्षी मार्गाचे काम सुरू आहे. एखाद्या महामंडळाने खर्चाचा पाऊण हिस्सा उचलून रेल्वे सेवा सुरू करण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. या सेवेवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी सिडकोने वाशी, सानपाडा व बेलापूर या स्थानकांवर व्यापार संकुलांची उभारणी केली. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सिडकोने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन दोन संकुलांना आयटी हबचे स्वरूप दिले. देशातील उत्कृष्ट स्थानके नवी मुंबईत आहेत. त्यामुळे वाशी, बेलापूर स्थानकांत मोठय़ा प्रमाणात आयटी कंपन्यांनी बस्तान बसविले आहे.
या सर्व मालमत्ता सिडकोने विकून टाकलेल्या आहेत. अशा या स्थानकांचे लवकरात लवकर हस्तांतरण होऊन स्थानकांची सुरक्षा आणि स्वच्छता मध्य रेल्वेच्या ताब्यात जावी यासाठी सिडको प्रशासन गेले वर्षभर प्रयत्न करीत आहे, पण मध्य रेल्वे ही स्थानके घेण्यास चालढकलपणा करीत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात माजी खासदार संजीव नाईक यांनी अनेक वेळा मध्य रेल्वे प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला आहे. ही स्थानके आता वीस-पंचवीस वर्षांची जुनी झाल्याने त्यांची डागडुजी करून देण्याची मागणी मध्य रेल्वेची आहे. पावसाळ्यात वाशी, ऐरोलीसारख्या स्थानकांत अनेक वेळा प्रवाशांवर पावसाच्या पाण्याचे अभिषेक झालेले आहेत. हे हस्तांतरण लवकरात लवकर केले जाईल असे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे, पण या घोषणा केवळ कागदावरच राहिलेल्या आहेत. जुईनगरसारखे एक स्थानक मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर हस्तांतरित करून घ्यावे असा एक प्रस्ताव सिडकोने दिलेला आहे, पण तोही रेल्वेला मंजूर नाही. त्यामुळे हस्तांतरणाचे हे घोंगडे भिजत पडले आहे.
नवी मुंबईकरांची गरज म्हणून सिडकोने खर्चाचा मोठा भार उचलून रेल्वे सेवा सुरू केली आहे. त्याचे दैनंदिन परिचालन हा सिडकोचा विषय नाही. त्यामुळे ही सेवा हस्तांतरित करून घेण्यासाठी मध्य रेल्वेकडे गेले अनेक महिने पाठपुरावा केला जात आहे. मात्र हे हस्तांतरण होत नसल्याची खंत आहे.
– व्ही. राधा, सहव्यवस्थापकीय संचालिका, सिडको

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा