मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पनवेल महापालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू झाला. त्यानंतर एकाच रात्री सव्वाशे सफाई कामगारांवर आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी कारवाई सुरू केली. शिंदे हे स्वत: रस्त्यावर उतरून कारवाईसाठी सज्ज झाले. त्यामुळे पनवेलच्या बेशिस्तीला लगाम बसून सुंदर आणि स्वच्छ शहर घडविण्यास मदत होईल, अशी आशा तमाम पनवेलकरांच्या मनात निर्माण झाली आणि अवघ्या १६५ दिवसांत त्यांची उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. आता शिंदे पनवेलच्या आयुक्तांचा पदभार पुन्हा स्वीकारत आहेत. पनवेलवासीयांना आपल्याशा वाटणाऱ्या या आयुक्तांकडून त्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

दोन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या लाडके आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पुन्हा पनवेल पालिकेची धुरा दिली. आठवडाभरापूर्वी जनतेचे आयुक्त अशी लोकांनी मान दिल्यानंतर आयुक्तांचा पुन्हा पनवेलमध्ये रोखठोक कारभार सुरू झाला. परंतु आयुक्तांच्या याच रोखठोक वृत्तीमुळे पनवेलकरांच्या अजून भरपूर कामाच्या अपेक्षा आयुक्त शिंदे यांच्याकडून वाढल्या आहेत.

पनवेल महापालिकेचा कारभार ७८ नगरसेवक चालवणार त्यासाठी सामान्य मतदारांनी पालिकेतील सदस्यपदी त्यांना निवडून दिले. परंतु पहिल्या पालिकेतील नगरसेवकांना आपले अधिकार किती माहीत आहे, याबाबत संदिग्धता आहे. यंदाची पालिकेची पहिली निवडणुकीत आयुक्त शिंदे यांच्या बदलीचा मुद्दा राजकारण्यांनी केल्यामुळे त्यांची चर्चा प्रचारादरम्यान जोरात झाली. निवडणुकीनंतर पहिल्या आठवडय़ात आयुक्त शिंदे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यावर पुन्हा फेरीवाले व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई जोरदार सुरू केली. या कारवाईने सामान्य पनवेलकर (खारघर पासून ते पनवेल शहरापर्यंत) सर्व खूश झाले असले तरी अजून पनवेल पालिका क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याची समस्या भीषण आहे. आयुक्तांनी खारघर, तळोजा, पनवेल शहर, कामोठे येथील नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सूमारे २५ दश लक्ष लिटर पाण्याची अजून पालिकेला गरज आहे. ही पाणीवाढ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळविण्यासाठी आयुक्तांना जोर लावावा लागणार आहे. पाण्यासोबत वसाहतींमधील कचरा समस्या हा जटिल प्रश्न बनला आहे. कचरा गावाजवळ नको असे सांगणारे घोट व तळोजातील इतर गावांतील आंदोलक ग्रामस्थ आणि त्यांच्याविरोधात घोट येथील सिडकोचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यासाठी झटणारे सिडकोचे अधिकारी हे दोन परस्परविरुद्ध घटक आंदोलनाच्या वेळी आयुक्तांच्या नावाची हमी एक-दुसऱ्यांना देत असतात. पनवेलमध्ये अशा प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावाची माया दोन्ही परस्परविरोधी गटावर असणारे हे शिंदे हे पहिलेच आयुक्त त्यानिमित्ताने पाहायला मिळते. वसाहतींमधील रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन यापुढे कुठे करावे, हा प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. गावठाण विस्तार योजनेतील स्थानिक ग्रामस्थांच्या घरांना नियमित करण्याची आणि गावठाणातील बांधकामांना पालिकेच्या सोयी-सुविधा पुरवायच्या अशी दुहेरी जबाबदारी आयुक्तांना यापुढे पार पाडावी लागणार आहे. काही प्रमाणात आता सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र धानसर, घोट, पडघे, तळोजातील काही गावांमध्ये आजही बससेवा जात नाही. त्यामुळे आयुक्तांना सफाईसोबत इतर सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. नुकतेच आयुक्त शिंदे यांनी नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ विद्यालय नवीन पनवेल येथे जाऊन शालेय व्यवस्थापनाची हजेरी घेतली. त्यानंतर शिशुवर्गातील पाल्यांना पहिलीत प्रवेश देण्याची बंद प्रक्रिया विद्यालय व्यवस्थापनाने सुरू केली. आयुक्त शिंदे यांना अशीच छडी पालिका क्षेत्रात सर्व खासगी विद्यालयांच्या व्यवस्थापनाला नियमबाह्य़ पद्धत अवलंबल्यास द्यावी लागणार असल्याचे नागरिकांची अपेक्षा झाली आहे. पालिकेच्या शाळांना आधुनिक शाळा बनविण्याचे आणि या विद्यालयांतील शिक्षण व शिक्षकांचा दर्जा खासगी विद्यालयांसारखा करावा लागणार आहे. त्यामुळे पनवेलमध्ये माफक दरातील शिक्षणाची गंगा घराघरांत पोहोचेल. पनवेलमध्ये पार्किंगचा सर्वात बिकट प्रश्न झाला आहे.

शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी काही गृहनिर्माण सोसायटय़ांना टीडीआर देऊन रस्ते रुंदीकरण केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न शहरातून गायब होऊ शकतो त्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मोठे मासळी बाजार साईनगर या परिसरात नाही. नागरिकांना टपालनाका येथे ४० रुपयांचा प्रवास करून ये-जा करावी लागते. साईनगरवासीयांचा मासळी व मटण बाजाराचा प्रश्न आयुक्तांनी मार्गी लावावा अशी अपेक्षा आहे. पनवेलमधील सांस्कृतिक व पर्यटनाचे सौंदर्य जपण्यासाठी वडाळे तलावाचे सुशोभीकरणाचे रखडलेले काम आणि शहरातील वाणिज्य संकुलाचे काम यामुळे प्रशासनाला झपाटय़ाने मार्गी लावावे लागणार आहे. शहरात मोठी बाग नाही. नवी मुंबई पालिकेच्या नेरुळ येथील वंडरपार्कसारखे सुसज्ज बगिचा पनवेलमध्ये पालिका प्रशासनाने उभारावा, अशी मागणी काही वर्षांपासून होत आहे. पनवेलमध्ये साईनगर भागात अशा मोठय़ा जमिनीवर पनवेलचे भव्य बगिचा असावा अशी  पनवेलकरांची अपेक्षा आहे. तळोजा परिसरात एका बाजूला इमारतींचे काम औद्योगिक क्षेत्राजवळ वाढत असल्याने नावडे व तळोजा नोडमधील बांधकामे व तेथे येणारी लोकवस्ती आणि सध्याच्या लोकवस्तीला होणारा प्रदूषणाचा त्रास यामुळे पालिका क्षेत्रामध्ये प्रदूषणाची समस्या मोठी आहे.

खारघर ते तळोजावासीयांना रोज नाक मुठीत घेऊन खिडक्या लावून पहाटे रासायनिक वायूच्या प्रदूषणाने सुरुवात करावी लागते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्तांना या परिसरात प्रदूषण मोजण्याची यंत्रे, नेमके प्रदूषण करणारी कारखाने कोणती, याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी पनवेलकरांची अपेक्षा आहे. आयुक्तांकडून अपेक्षा भरपूर आहेत; मात्र आयुक्तांनी पुढाकार घेऊन सध्या रस्ते व पदपथ मोकळी केलेल्या कारवाईने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल ‘आपले आयुक्त’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे.

Story img Loader