ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्राचा पुढाकार; मे पर्यंत संग्रहालय तयार
पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>
दुर्मीळ असा देवमाशाचा सांगाडा पाहण्याची अनोखी संधी अभ्यासकांना व पर्यटकांना ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रात मिळणार आहे.
उरणच्या समुद्रकिनारी मृतावस्थेत सापडलेल्या देवमाशाचे जतन करण्यात वनविभागाला यश आले असून दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येत आहे. मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती वन विभागाने दिली.
गेल्या पावसाळ्यात उरण येथील केगाव-माणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर ४५ फूट लांबीचा देवमासा मृतावस्थेत सापडला होता. तो
दुर्मीळ असल्याने त्याचे जतन करण्याचे सागरी जैवविविधता केंद्राने ठरविले आहे.
या देवमाशाचे मांस व सांगाडा वेगळे करण्यात वन विभागाला यश आले. मांस काढलेल्या माशाचा सांगडा अन् दीर्घकाळ टिकविण्यासाठी कोरडे करण्याचे आवाहन होते. या भल्यामोठय़ा देवमाशाच्या सांगाडय़ातून तेल बाहेर पडत होते.
विविध रासायनिक प्रक्रिया करून या सांगाडय़ाला कोरडे करण्यात आले आहे. त्याचे अवशेष जतन करण्यासाठी त्याला ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रात ठेवण्यात आले आहे.
या माशाच्या सांगाडयावर आणखी एक रासायनिक प्रक्रिया करून काचेच्या पेटीत तसेच त्याचे संग्रहालय तयार करून पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गहाळ अवयवांची कृत्रिम निर्मिती
उरण येथून हा सांगाडा आणताना काही अवयव गहाळ झाले आहेत. त्या जागी वन विभाग कृत्रिम अवयव निर्माण करून हा सांगाडा पूर्ण करणार आहे. तसेच काचेमध्ये ठेवल्यानंतर कोणता अवयव कृत्रिम आहे, याची माहिती नमूद करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेला अंदाजे ३ कोटी खर्च होणार आहे.
या देवमाशाला कोरडे करण्यात आले असून गहाळ अवयवांची कृत्रिम निर्मिती करून सांगाडा पूर्ण केला जाणार आहे. अवशेष जतन करून पर्यटकांना संग्रहालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मे महिन्यापर्यंत तो देवमासा पर्यटकांना व अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
-एन वासुदेवन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक