नवी मुंबई शहरात मागील दोन दिवसापासून हवेत गारवा जाणवू लागला आहे. दिवाळी संपताच हवेत सकाळच्यावेळी धुके पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या आठवडाभरात शहरातील हवेचे तसेच ध्वनी प्रदुषण वाढळल्याची आकडेवारी आवाज व इतर संस्थांनी दिली आहे. नवी मुंबई शहराच्या एका दिशेला खाडी किनारा तर दुसरीकडे पारसिक डोंगररांगा आहेत. याच शहरात मोठा औद्येगिक पट्टा असल्याने शहरातील हवेच्या प्रदुषणात नेहमी चढउतार पाहायला मिळतो.
हेही वाचा- पावसामुळे अंजीरच्या हंगामाला उशिरा सुरुवात; एपीएमसीत दाखल होतेय अवघी एक गाडी
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्याने व मैदाने आहेत .वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या पेहरावातही बदल दिसून येऊ लागला आहे. महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेली उद्याने तसेच हरितपट्टे ,त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक यांची संख्या मोठी आहे तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. वातावरणात थंडावा निर्माण झाला असून सकाळच्यावेळी शहरावर धुक्यांची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळते.
दिवसा मात्र उन्हाचा चटका लागत असून संध्याकाळी ४ नंतर व सकाळी हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे.नियमितपणे मॉर्निंग वॉक करणाऱ्या दिनेश काटकर यांनी सांगीतले की मागील दोन तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून सकाळी थंडी पडत असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.