कल्याण येथे मेट्रो ५ चे उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बाबत नवीमुंबई वाहतूक शाखेने तयारी केली असून सोमवार रात्री १ वाजल्यापासून मंगळवारी पंतप्रधानांचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते मेट्रो ५ आणि ९ हजार घरांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांसोबत इतरही महत्वाच्या व्यक्तीचा ताफा यामध्ये असेल. अशावेळी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हे वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
यामध्ये मीरा भाईंदर कडून येत पुणे, गोवा, रत्नागिरी,पनवेल, कळंबोली सर्कल, तळोजा व नाशिक, गुजरात, तसेच भिवंडीकडे जाणाऱ्या आणि कल्याण फाटा व शिळफाटामार्गे मुंब्रा बायपास या सर्व मार्गावरील अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून कळंबोली सर्कल येथून खारघर, उरण फाटा, सीबीडी, महापे उड्डाणपूल, रबाळे नाका, ऐरोलीतील पटणी सर्कल, ऐरोली खाडी पूलमार्गे पुढे इप्सित स्थळी जाऊ शकणार आहेत. या शिवाय जे.एन.पी.टी. कडून गुजरात दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कल्याण फाटा व शिळफाट्यावर प्रवेश बंदी असून या मार्गाऐवजी जेएनपीटी उरणफाटा-सीबीडी, रबाळे एमआयडीसी मार्गे रबाळे नका ऐरोली – पटणी मार्गे ऐरोली खाडी पुलावरून पुढे जाता येणार आहे. या बदलाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखा उपायुक्त सुनील लोखंडे यांनी केले आहे.