नवी मुंबई सिडको महामंडळाने २६ हजार घरांच्या महासोडतीत १९,५१८ विजेत्यांना चार दिवसांपूर्वी घराचे इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेंट) पाठवले. या पत्रात ३२२ चौरस फुटांच्या घराचे क्षेत्रफळ २७.१२ चौरस मीटर दर्शविण्यात आल्यामुळे विजेत्यांना धक्का बसला आहे. घराचे चटई क्षेत्र कमी केले, त्यामुळे सिडको घरांची किमत कमी करणार का, असा प्रश्न विजेते उपस्थित करत आहेत. दरम्यान याच आशयपत्रात सिडकोने घराची किंमत आणि घराचे रेरा नियमानुसारचे चटई क्षेत्र अंदाजे असल्याचे म्हटल्याने विजेत्यांचा संभ्रम वाढला आहे.
सिडकोने विजेत्यांना पाठविलेल्या इरादा पत्रात रेराच्या नियमानुसार चटई क्षेत्रात बदल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडकोने सोडतीपूर्वी दर्शविलेल्या जाहिरातीमध्ये वाशी येथील वन बीचएचके घरांचे चटई क्षेत्र ३२२ चौरस फूट दर्शविण्यात आले होते. इरादा पत्रात घऱांचे क्षेत्र चौरस फुटानूसार २९१.९२ एवढे होत असल्याने तब्बल ३० चौरस फुटाचे घर कमी कसे घ्यावे असा प्रश्न विजेत्यांसमोर उभा आहे.
चटई क्षेत्र कमी असल्याचे आशय पत्रात दर्शविले असले तरी किंमत मात्र तेवढीच आकारण्यात आली आहे. याच पत्रात किंमत व क्षेत्र हे अंदाजे असल्याचे सुद्धा म्हटल्याने विजेत्यांचा घोळ अजून वाढला आहे. इरादा पत्रात किंमत आणि क्षेत्रात स्पष्टता नसल्याने पुढील प्रक्रियेसाठी अजून दीड लाख रुपये भरण्यासाठी सिडकोला होकार दर्शवावा की नाही अशा संभ्रमात विजेते पडले आहेत. विजेत्यांना सिडकोला दीड लाख रुपये पुढील १५ दिवसांत भरावे लागणार आहेत. ही रक्कम न भरल्यास इरादा पत्र रद्द होण्याची भीती विजेत्यांना वाटत आहे. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
३० चौरस फुटांचा फरक सिडकोने सोडतीपूर्वी दर्शविलेल्या जाहिरातीमध्ये वाशी येथील वन बीचएचके घरांचे चटई क्षेत्र ३२२ चौरस फूट दर्शविण्यात आले होते. इरादा पत्रात घऱांचे क्षेत्र चौरस फुटानूसार २९१.९२ एवढे होत असल्याने तब्बल ३० चौरस फुटाचे घर कमी कसे घ्यावे असा प्रश्न विजेत्यांसमोर उभा आहे.