उरण : जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले असून गुरुवार (१ जून) पासून जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही पावसाळ्यातील पुढील चार महीने भाऊचा धक्का( फेरी वार्फ जेट्टी) येथून सुटणार आहेत. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.
उरण मधील मोरा व जेएनपीटी या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवा बारमाही म्हणजे पावसाळ्यातही सुरू असतात. यातील मोरा ते मुंबई(भाऊचा धक्का) या सेवेचे पावसाळी तिकीट दर वाढविण्यात येतात. तर जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ही सेवा आठ महीने सुरू असते.ती पावसाळ्यात बदलून जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जेएनपीटी लाँच सेवा ही रात्री दहा ऐवजी ९ वाजता बंद केली जाते. या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीक ही प्रवास करीत आहेत.