नवी मुंबई : बदलापूरच्या घटनेनंतर राज्यभरात मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार समोर आल्यानंतर मुली, विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानेही सर्व बालवाडी शिक्षिका, मदतनीस तसेच पालिका आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधन, घड्याळी तासिका अशा सर्वच शिक्षकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पालिकेच्याच पूर्वप्राथमिक, प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये जवळजवळ ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका क्षेत्रात असलेल्या बालवाडी तसेच अंगणवाडीची संख्याही मोठी असून आता या प्रत्येक ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षक, कर्मचारी, मदतनीस यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

हे ही वाचा…सिडकोचे खारघरचे घर २ कोटींना; पहिल्याच दिवशी १२०० इच्छुकांची नोंदणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी महणून पालिकेने शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण विभाग उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी याबाबतचे पत्र सर्वच शाळांमध्ये पाठवले आहे. त्यामुळे आता पालिका शाळांमध्ये, अंगणवाडी, बालवाडी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षण विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक तसेच मदतनीस किंवा इतर कर्मचारी यांना ते ज्या ठिकाणी रहिवास करतात त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यातून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

हे ही वाचा…बांधकामस्थळी सीसीटीव्हींचा पहारा, नवी मुंबईतील बांधकाम नियमावली व तक्रार निवारणाबाबतची प्रमाणित संचालन प्रक्रिया जाहीर

खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचे सुरक्षेचे काय?

पालिकेच्या शाळांप्रमाणेच खासगी शाळांमध्येही कायम व तात्पुरत्या स्वरूपात हजारो शिक्षक मदतनीस काम करतात. त्या कर्मचाऱ्यांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतले जाते का? त्याची माहिती शिक्षण विभागाने घेऊन त्या शाळांमधील शिक्षक मदतनीस यांचेही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतले जाणार का असा प्रश्न आहे. सीबीएसई शाळा, आयसीएसई खासगी शाळा, क्लासेस या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही शासनाला व महापालिकेला योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हे ही वाचा…नवी मुंबईत वीस लाखांचे हेरॉईन जप्त; तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

शासनाने शाळांमधील शिक्षक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून सुरक्षिततेच्या कारणासाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही त्याची योग्य ती अंमलबजावणी केली जाणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Character verification certificates mandatory for teachers and support staff of navi mumbai municipal school sud 02