नवी मुंबई: अर्धवेळ काम करून पैसे कमवा असे आमिष दाखवून नवी मुंबईतील बेलापूर येथील एका व्यक्तीची फसवणूक झाल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला युट्युबवर व्हिडीओला लाईक, फॉलो करा, त्याचेच पैस दिले जातील असे सांगण्यात आले होते.
नवीन छिल्लर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवीन हे आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. १३ जून रोजी त्यांच्या मोबाईलवर घरबसल्या पैसे कमवा अशा आशयाचा संदेश आला. तसेच त्यात टेलिग्राम खात्यावर सदस्यत्व देणार, युटूयबवर दिलेला टास्क फॉलो करा, लाईक केले की त्याप्रमाणे पैसे मिळणार असे नमूद केले होते. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर त्यांना टेलिग्राम समुद सदस्य करण्यात आले. सुरवातीला त्यांनी २ हजार रुपये भरले व दिलेले लक्ष पूर्ण केल्यावर त्यांना २ हजार ८०० रुपये काही दिवसात मिळाले.
हेही वाचा… पनवेल: पॅनकार्ड बँकखात्यासोबत लींक करण्याच्या बहाण्याने २ लाख ७० हजार लुटले
त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला व त्यांनी काम सुरुच ठेवले. नंतर वेळोवेळी दिलेले लक्ष्य पूर्ण केले व त्याप्रमाणात पैसेही भरले. मात्र पुन्हा कधी त्याचा मोबदला देण्यातच आला नाही. असे थोडे थोडे करीत त्या अधिकाऱ्याने तब्बल ४ लाख ७५ हजार रुपये दिलेल्या बँक खात्यात भरले. मात्र तरीही मोबदला न आल्याने नोकरी देणाऱ्या व्यक्तीला विचारणा केली असता तुम्ही अजून ६ लाख ५५ हजार २०० रुपये भरा तुम्हाला १५ लाख रुपये दिले जातील असे सांगण्यात आले. यावेळी मात्र अधिकाऱ्याची खात्री पटली की आपली फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत सायबर शाखेकडे अनोळखी व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
.