निवडणुकांच्या तोंडावरच नागरी सुविधांची, त्यातही उद्यानांची टूम निघते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीच्या आधी पालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरात नागरी सुविधांचा ढोल पिटत साने गुरुजी बालउद्यान उभारले. आज वर्षभरानंतर त्या जागी उद्यान होते, असे म्हणण्याची वेळ पालिका प्रशासनाने नागरिकांवर आणली आहे. या उद्यानातील मुलांना खेळायच्या साधनांची मोडतोड झाली आहे. साने गुरुजींच्या जीवनाची ओळख व्हावी यासाठी लावण्यात आलेली तैलचित्रेही खराब झाली आहेत. विशेष म्हणजे हे उद्यान बांधून पूर्ण व्हायच्या आधीच त्याचे आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते, तर दिघा तलावानजीक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर बांधलेले हे बालउद्यान बेकायदा असल्याचा दावा एमआयडीसी प्रशासनाने केला आहे.
नगरसेवकाने पालिकेच्या पैशातून दोन कोटी ६० लाख रुपये यासाठी खर्ची घातले आहेत. उद्यानात मिनी ट्रेन, काही तैलचित्रे आणि खेळाची इतर साधने बसविण्यात आली होती. त्यांची मोठय़ा प्रमाणावर मोडतोड झाली आहे.
झाडांभोवतीचे सिमेंटचे कठडे, तसेच आसनांना तडे गेले आहेत. प्रवेशद्वारावरील फलक कोसळलेले आहेत. उद्यानात आधुनिक पद्धतीचे दिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. सुट्टीच्या दिवशी लहानग्यांना मिनीट्रेनचा आनंद लुटण्यासाठी पाच रुपये आकारण्यात येतात. ही मिनीट्रेन सध्या बंद पडली आहे. अनेकदा सायंकाळनंतर नागरिक लहानग्यांना उद्यानात घेऊन येताना भीतीच्या सावटाखाली असतात.
दरम्यान, उद्यानाच्या देखभालीबरोबरच पालिकेने सुलभ शौचालयासाठी जागा देण्याचे स्पष्ट केले होते. तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. त्यानंतरही पालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शौचालय बांधलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालउद्यानाची असुविधांबाबत संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांकडून घेऊन दुरुस्ती करण्यात येईल. मात्र या ठिकाणी शौचालय बांधणीला स्थानिक लोकांचा मोठा विरोध आहे.
चंद्रकांत तायडे, उद्यान प्रशासकीय अधिकारी

शरद वागदरे

बालउद्यानाची असुविधांबाबत संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांकडून घेऊन दुरुस्ती करण्यात येईल. मात्र या ठिकाणी शौचालय बांधणीला स्थानिक लोकांचा मोठा विरोध आहे.
चंद्रकांत तायडे, उद्यान प्रशासकीय अधिकारी

शरद वागदरे