बोनसरी, बोरिवली, चिंचवली
नवी मुंबई शहरनिर्मितीच्या प्रक्रियेत अनेक गावांचा सर्वागीण विकास झाला; मात्र काही गावे नागरीकरणाच्या रेटय़ात नामशेष झाली. बोनसरी, बोरिवली, चिंचवली, टेटवली आणि सावली ही ती पाच गावे. यातील पहिली चार गावे ही महाराष्ट्र औद्योगित विकास महामंडळाच्या हद्दीत होती तर घणसोली आणि कोपरखैरणे गावच्या मधोमध असलेले सावली गाव सिडकोच्या क्षेत्रात येत होते. या उद्ध्वस्त गावांची एक वेगळी आख्यायिका आहे.
डिसेंबर १९९२मध्ये नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. त्यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीत असलेली असलेली ४५ गावे पालिकेत वर्ग करण्यात आली; मात्र जून २००७ मध्ये दहिसर मोरी भागातील १४ गावांना पालिकेतून वगळण्यात आले. त्यात नवी मुंबईत अडवली भुतवलीसह ३० गावांचा समावेश आहे. या अडवली भुतवलीच्याच रांगेत बोनसरी, बोरिवली आणि चिंचवली ही गावे येत होती. बोनसरी गावाचे अस्तित्त्व डी. आर. पाटील दगडखाणीच्या खालील बाजूस एका झोपडपट्टीच्या रूपात शिल्लक आहे. बोनसरी गावाच्या हद्दीत सर्वाधिक दगडखाणी असून येथील कामगार या गावाच्या वेशीवर आजही राहतात. ‘हर्डिलिया कंपनी’च्या मागील बाजूस हे गाव होते. जेमतेम सात घरांचा हा पाडा केवळ शेतीवाडीचे संरक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आला होता. अवघे २०-२५ रहिवासी असलेल्या या गावात १९४३ च्या सुमारास प्लेग आणि नारू आजाराची साथ पसरली. या गावातील सर्व पाटील, म्हात्रे कुटुंब कुकशेत गावाच्या आश्रयाला आली आहेत.
गावात एक कालभैरवाचे मंदिर होते. ते मंदिर आजही आहे. गावाच्या पाऊलखुणा आता युनियर हर्डिलिया या कंपनीच्या हद्दीत सापडतात. एमआयडीसीने या गावाची सर्व जमीन संपादित केली आणि उद्योजकांना विकली आणि गावाचे अस्तित्वच नाहीसे झाले. आता तिथे केवळ दगडखाणींची धडधड ऐकू येते. महसूल अभिलेखात या गावाचा उल्लेख आता केवळ नावापुरता राहिला आहे. दगडखाणींची जागा नंतर सिडकोने हस्तांतरित केल्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीतूनही ही गावे नाहीशी झाली. पूर्वी गावाच्या चारही बाजूने जंगले होती. त्यात हिंस्र श्वापदेही होती. दक्षिण बाजूला असलेली विहीर कुकशेत आणि शिरवणे गावांची तहान भागवत होती. कालांतराने ही विहीरही हर्डिलिया कंपनीच्या अखत्यारीत गेली.
अडवली भुतवली गावाच्या रांगेत असलेल्या बोरिवली गावाचीही अशीच स्थिती झाली आहे. हे गाव आदिवासी जमातीचे होते. खैरणे, तुर्भे, महापेतील काही ग्रामस्थांची जमीन या बोरिवली गावात होती. एमआयडीसीने ही जमीन वेळीच संपादित न केल्याने नंतर ती भूमाफियांनी हडप केली. आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या या बोरिवली गावाची हद्द सध्याच्या अडवली, भुतवली गावासमोरील पेट्रोल पंपामागील बाजूस होती. येथील काही आदिवासी आजही पूर्वेकडील डोंगरावर राहतात; पण शेतीकामासाठी महापे, खैरणे, बोनकोडे भागात आलेले काही आदिवासी या बोरिवली गावात आश्रयाला होते. काही भूमाफियांनी नंतर त्यांना हुसकावू लावल्याने ते डोंगराच्या आश्रयाला गेल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हे गाव नंतर ओस पडले. या गावाच्या आसपास असलेल्या २०० एकर जमिनीवर समोरच्या गावातील ग्रामस्थ शेती करीत होते. ती जमीन एमआयडीसीने संपादित न केल्याने खासगी व्यावसायिकांना विकण्यात आली; तर काही जणांनी ती धाकदपटशाने मिळवली. त्यामुळे बोरिवली गावाच्या जमिनीचा विकास शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला नाही. या जमिनीवर अनेक बेकायदा व्यवसाय आहेत. ही जमीन पुन्हा मिळावी यासाठी काही ग्रामस्थांचा लढा आजही कायम आहे.
याच बोरिवली गावाच्या उत्तर बाजूस चिंचवली हा एक दुसरा गाववजा आदिवासी पाडा होता. या गावाच्या हद्दीतील तलाव आजही अस्तित्वात आहे. येथील आदिवासीही अन्यत्र स्थायिक झाले आहेत. या ठिकाणी मरीआईचे एक मंदिर आजही आहे. महापेतील ग्रामस्थ या मंदिरात पूजेसाठी जातात. मुंबईतील अनेक श्रीमंतांनी पूर्वीच येथील जागा खरेदी करून ठेवल्या. त्या नंतर त्या खासगी विकासकांना विकण्यात आल्या. त्यामुळे या चिंचवली भागात सध्या भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या उथळ भगातील जागा नंतर विकल्या जाणार आहेत. अडवली, भुतवली गावाच्या मागील बाजूसही काही मोठे खड्डे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे या भागातील निसर्गसंपदा संकटात आली आहे. या जमिनींचे सपाटीकरण करून त्या विकण्याचा डाव आखला जात आहे. पालिका आणि पोलिसांनी या जमिनी हडप करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. (पूर्वार्ध)
स्वतंत्र अस्तित्वाचा अभाव
बोरवली, बोनसरी, आणि चिंचवली या तीनही गावांत अतिशय विरळ लोकवस्ती होती. विशेष रूढी परंपरा, सण-उत्सव तिथे रुजले नाहीत. शेजारच्या गावांचे अनुकरणच या गावांनी केले. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख तयार होऊ शकली नाही.
बेकायदा बांधकामांचे पेव
नवी मुंबईच्या भूतकाळाचा एक छोटासा भाग असलेली ही गावे आधुनिक नवी मुंबईतील रहिवाशांना माहीतही नाहीत. एमआयडीसीने बोनसरी गावाची जमीन केवळ संपादित केली पण डोंगराच्या पायथ्याशी असलेली बोरवली व चिंचवली गावांतील जमीन संपादित करण्यात आली नाही. त्यामुळे आता तिथे बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. या जमिनीवर एमआयडीसीचे आरक्षण टाकण्यात आले आहे, पण या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.