नवी मुंबई : भारतात बंदी असलेला चिनी लसूण वाशीतील ‘एपीएमसी’त अफगाणिस्तानमार्गे दाखल होत आहे. बाजारात येणारा हा लसूण चीनचा आहे की नाही, याची शाश्वती मिळत नसल्याने प्रशासनापुढे मोठा पेच उभा आहे. एपीएमसीतील विशिष्ट लसणाची समितीमार्फत माहिती घेतल्यानंतर ठोस पुरावा मिळाला नाही.

सरकारने काही वर्षांपासून चीनमधील कृषीमालाची आयात थांबवली आहे. त्यात लसणाचाही समावेश आहे. मात्र गेले दोन महिने भारतातील लसणाचे उत्पादन घटल्याने भाव घाऊक बाजारात ३५० रुपये तर किरकोळ बाजारात ४०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

हे ही वाचा…सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्त्या, पनवेलकरांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांचे क्रमांक जाहीर

त्यामुळे लसणाचे वाढते दर पाहता काही व्यापाऱ्यांनी नफ्यासाठी एपीएमसी बाजारात चिनी लसणाची विक्री सुरू केली आहे. आधी हा लसूण नेपाळमार्गे भारतात दाखल होत असे. मात्र आता आयातदारांनी चीनी लसूण प्रथम अफगाणिस्तानात मागवून तो नंतर भारतात अफगाणी लसूण म्हणून विक्री सुरू केल्याचे बोलले जात आहे.