नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गालगतच्या पाणथळींना लागून खाडीकडील बाजूस असलेले काही एकर आकाराचे एक मोठे बेट निवासी संकुलासाठी खुले करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे, मात्र आता पाणथळी, तिवरांची जंगले यांना भेदून या बेटाकडे जाणारा ३० मीटर रुंदीचा एक लांबलचक रस्ता उभारण्यासाठी सिडको आणि महापालिका प्रशासनाने एकत्रित पावले उचलली असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. या पाणथळी म्हणजे लाखो फ्लेमिंगोंचा अधिवास असून त्या बिल्डरांसाठी खुल्या करण्याचा महापालिकेचा निर्णय यापूर्वीच वादात सापडला आहे. असे असताना सिडकोने करावे बेटासाठी तयार केलेल्या नव्या विकास आराखड्यात पामबीच मार्गापासून ३० मीटर रुंदीचा नवा रस्ता थेट या बेटापर्यत आखण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

नैसर्गिक पाणथळी आणि खाडी किनाऱ्याच्या मधोमध असलेल्या ‘करावे द्वीपा’च्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार यापूर्वीच राज्य सरकारने सिडकोकडे सोपविले आहेत. लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना मार्च २०२४ मध्ये सिडकोने ‘करावे द्वीपा’चा प्रारुप विकास आराखडा तयार केला. निवडणुकांच्या हंगामातच यासंबंधीच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या. या प्रक्रियेला काही तुरळक अपवाद वगळला तर नवी मुंबईकरांचा प्रतिसाद लाभला नाही. या आराखड्यानुसार सिडकोने खाडी किनारी असलेल्या संपूर्ण पट्ट्यात विस्तीर्ण उद्यानासाठी असलेले आरक्षण बदलून ते रहिवास वापरासाठी खुले करण्याचा निर्णय जाहीर केला. हे करत असताना पामबीच मार्गापासून या नव्या द्विपाच्या दिशेने पोहच रस्ता असावा यासाठी सिडकोने विकासआराखड्यात २० मीटर रुंदीच्या रस्त्याची आखणी केली. सिडकोने या विकास आराखड्यास अंतिम स्वरुप देण्यासाठी नेमलेल्या समितीने हा २० मीटरचा प्रस्तावित रस्ता आणखी रुंद करताना तो ३० मीटरचा करण्यास मंजुरी दिली असून यामुळे पाणथळींच्या आसपास निवासी संकुले उभारण्याचा सिडको प्रशासनाचा इरादा स्पष्ट असल्याचे दिसून येत आहे.

Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
koparkhairane sectors six daily market building is not started
दैनंदिन बाजार धूळखात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली कोपरखैरणेतील बाजार इमारत वापराविना
Eknath Shinde Amit Shah Meeting
“किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली?
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”

हेही वाचा…दैनंदिन बाजार धूळखात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली कोपरखैरणेतील बाजार इमारत वापराविना

निवासी संकुलांसाठी नव्या रस्त्याची आखणी ?

सिडकोच्या अखत्यारित असलेल्या करावे द्वीपासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या विकास आराखड्यासाठी सिडकोने तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली होती. ही समिती नागरिकांनी नोंदविलेल्या हरकती, सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी आणि प्रारुप आराखड्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी काम करणार होती. या समितीत सिडकोचे मुख्य नियोजनकार रवींद्रकुमार मानकर, वरिष्ठ नियोजनकार जगदीश पाटील, सहाय्यक नियोजनकार प्रियदर्शन वाघमारे, निवृत्त सहाय्यक संचालक अशोक खांडेकर आणि निवृत्त नगररचनाकार किशोर आग्रहारकर यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने हरकती, सूचनांवर सुनावणी घेऊन मुळ विकास आराखड्यात काही बदल सुचविले आहेत. या बदलांमध्ये करावे द्वीपाच्या दिशेने ३० मीटर रुंद रस्त्याची आखणी करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेने काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारला सादर केलेल्या विकास आराखड्यात पामबीच मार्गालगत असलेल्या आणि करावे द्वीपास लागून असलेल्या काही पाणथळींचे क्षेत्र निवासी क्षेत्रासाठी खुले करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. हा निर्णय घेत असताना या द्विपाच्या दिशेने जाण्यासाठी महापालिकेने आपल्या विकास आराखड्यात ३० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित केला होता. हे संपूर्ण क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने येथे खाडी किनाऱ्यापर्यत ३० मीटरचा रस्त्याचे बांधकाम योग्य होईल का असा सवाल यापूर्वीच पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला होता. असे असताना सिडकोने आपल्या विकास आराखड्यात याच भागातून २० मीटर ऐवजी ३० मीटरचा रस्ता प्रस्तावित करून महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणेच येथील आखणी केली आहे.

हेही वाचा…ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती

रस्ता पाणथळींनी बाधीत ?

दरम्यान ३० मीटरच्या रस्त्याची आखणी करत असताना हा रस्ता पाणथळी, तिवरांची जंगले तसेच किनारा अधिनियम क्षेत्रातून जात असल्याचे निरीक्षण सिडकोने नेमलेल्या समितीनेच नोंदविले आहे. तसेच या रस्त्याचे बांधकाम करायचे असेल तर यासंबंधी पर्यावरणाच्या तसेच ‘एमसीझेडएमए’कडून परवानग्या घेणे आवश्यक राहील असा अभिप्रायही या समितीने नोंदविला आहे.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र वाचायला हवीत यासाठी सिडको आणि महापालिकेने प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. असे असताना पामबीच मार्गावर खाडी किनारी असलेले एखादे द्विप निवासी संकुलांसाठी खुले करायचे आणि पाणथळी, सीआरझेडमधून खाडीच्या दिशेने नवा रस्ता काढायचा हे धक्कादायक आहे. हा रस्ता नव्या द्विपावरील बंगल्यांसाठी बांधला जाणार आहे का, याचे उत्तर शासकीय यंत्रणांनी द्यायला हवे. जेम्स आवारे, पर्यावरण प्रेमी

Story img Loader