नवी मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळवून देण्यासाठी महागृहनिर्मिती करणाऱ्या सिडकोने नवी मुंबई परिसरातील २६ हजार घरांचे दर मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केले. त्यानुसार वाशी येथील अल्प उत्पन्न बचत गटातील सदनिकेची किंमत ७४ लाख रुपये ठरवण्यात आल्याने या घरांच्या खरेदीचे स्वप्न् पाहणाऱ्या सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे, तळोजा परिसरात आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या सदनिकांची किंमत २५ लाखांच्या घरात असली तरी, या घरांकडे किती ओढा वाढेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

तीन महिन्यांपूर्वी दसऱ्याच्या मुहुर्तावर सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटाकरिता एकूण २६ हजार घरांची सोडत जारी केली होती. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये असलेल्या या घरांच्या किमती मात्र जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. या सोडतीला वेळोवेळी मुदतवाढ देऊन आता दहा जानेवारीपर्यंत अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री या घरांचे दर जाहीर करण्यात आले. मात्र, यातील वाशी, खारघर नोडमधील घरांचे दर पाहून अनेकांचा हिरमोड झाला आहे.

हेही वाचा…तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी

गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा या सोडत प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे जवळपास एक लाखाहून अधिक जणांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. घरांचे दर जाहीर केले गेले नसल्याने सुरुवातीला अनेक अर्जदारांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र, ही घरे बाजारभावापेक्षा स्वस्त असतील, असे भाष्य सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केल्यानंतर अर्जनोंदणीत वाढ झाली होती. यातील अनेक अर्जदारांचा ओढा वाशी, खारघरमधील घरांकडे होता. मात्र, या घरांचे दर पाहून या अर्जदारांचा स्वप्नभंग झाला आहे. यासंदर्भात अनेकांनी समाजमाध्यमांवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

सिडकोने ऑक्टोबर २०२२ ला एलआयजी श्रेणीतील तळोजातील ३२२ चौरस फुटांचे घर ३२ लाख रुपयांना विक्री केले. आताच्या योजनेत आर्थिक दुर्बल घटकांसाठीची उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये केली. मात्र, तेवढ्याच क्षेत्रफळाचे घराचे दर २५ लाख रुपये केले. तळोजातील न विकली जाणारी घरे विकण्यासाठी ही योजना आणली का? यशवंत भोसले, तळाेजा

हेही वाचा…वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत खारघर रेल्वेस्थानकानजीकच्या घराचे दर ९७ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. अल्प उत्पन्न गटातील उत्पन्न मर्यादा सहा ते नऊ लाख आहे. या मर्यादेत वेतन असलेल्यांना घरासाठी एवढे कर्ज मिळणार कसे? – जयेश धुळप, पनवेल.

परिसर क्षेत्रफळ(चौ.फु.) किंमत (लाख रु.)
तळोजा से. २८ ३२२ २५.१
तळोजा से. ३९ ३२२ २६.१
खारघर बस डेपो ३२२ ४८.३
खारकोपर २ए, २ बी ३२२ ३८.६
कळंबोली बस डेपो ३२२ ४१.९
वाशी ट्रक टर्मिनल ३२२ ७४.१
खारघर सेक्टर १ ए ५४० ९७.२

Story img Loader