लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : शहरांचा शिल्पकार अशी ओळख असणाऱ्या सिडकोला उद्योगनगरी उभारण्याचे वेध लागल्याचे चित्र सिडकोच्या गुरुवारी सादर झालेल्या २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दिसले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संचालक मंडळासमोर अर्थसंकल्प सादर केला. १३,९४० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात लॉजिस्टिक पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी एज्युसीटी अशा १६ विविध प्रकल्पांचा ठळक समावेश केला आहे.
येऊ घातलेले आर्थिक वर्ष नवी मुंबई शहरासाठी महत्त्वाचे आहे. याच वर्षात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले मालवाहू आणि प्रवासी उड्डाण होणार आहे. परिणामी शहराला कंटेनरची कोट्यावधींची उलाढाल, औद्योगिक विकास तसेच व्यापाराची संधी मिळणार आहे. या सर्व उद्योगसंधींचे प्रतिबिंब या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उमटले. गुरुवारी मुंबई येथील निर्मल भवन येथे सिडको संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये व्यवस्थापकीय सिंघल यांनी २०२५-२६ च्या वर्षासाठी १३,९४० कोटी रुपयांची उलाढाल आणि १० कोटी रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पात मागील वर्षीपेक्षा २१००.७१ कोटींनी वाढ झाली आहे. सिडकोचे भूखंड आणि घरांच्या विक्रीतून सिडकोची तिजोरी भरलेलीच असल्याचे संकेत सिंघल यांनी या अर्थसंकल्पातून दिले आहेत. सिडकोने हाती घेतलेल्या १६ महत्वाच्या प्रकल्पांमुळे सिडको क्षेत्रासह नवी मुंबई शहर तसेच पनवेल व उरण या तालुक्यांमधील विकासाला चालना मिळणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये उद्योग नगरी, लॉजिस्टिक पार्क आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था उभारणीची आखणी करण्यात आली आहे. एज्युसीटी या प्रकल्पांवर सिडकोने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सिडकोकडे खर्च करण्यासाठी पुरेशी रकमेची तरतूद असल्याने या प्रकल्पांवर सिडको खर्च करणार असे या अर्थसंकल्पात दर्शविले आहे.
अंदाजपत्रक सारांश (रुपये कोटींमध्ये)
आर्थिक वर्ष | जमा | खर्च | शिल्लक |
२०२४ – २५ | ११,९०२ | ११,८३९.२९ | ६३.४० |
२०२५- २६ | ६ १३,९५० | १३,९४० | १० |
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
- द्रोणागिरी येथे ४४१ हेक्टर क्षेत्रफळावर लॉजिस्टिक्स पार्क.
- राष्ट्रीय महामार्ग ४ बी, आणि राज्य महामार्ग ५४ जवळ लॉजिस्टिक्स हब, वेअरहाऊसिंगसाठी सुविधा.
- एज्युसिटी प्रकल्प.
- कोंढाणे धरणाच्या बांधकामाला गती
- तळोजा येथील घोट चाळ गावातील समग्र नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामधील २६ टक्के भागीदारीतून विविध सुविधांचे निर्माण
- गृहनिर्माण प्रकल्प, नैना प्रकल्पाचा विकास