नवी मुंबई : ‘माझे पसंतीचे घर’ या योजनेच्या माध्यमातून २६ हजार घरे विक्रीसाठी काढणाऱ्या सिडको प्रशासनाने आता बाल्कनीचे क्षेत्र मोजल्यास घरांचे क्षेत्र योग्यच असल्याची सारवासारव सुरू केली आहे. ही सोडत काढत असताना केलेल्या जाहिरातीत घरांचा आकार ३२२ चौरस फुटांचा असेल असा दावा केला गेला होता. प्रत्यक्षात मात्र घराच्या इरादा पत्रात २९१.९२ चौरस फुटांचा उल्लेख असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी आमदार संदीप नाईक यांनीही या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही तफावत कागदपत्रांसह दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यानूसार घर विक्री करताना मूळ घराचे चटईक्षेत्र (कारपेट) उल्लेख करावा लागतो. तसेच घरासोबतच्या बाल्कनीच्या क्षेत्राचा उल्लेख नसल्यामुळे ही तफावत वाटत असल्याचा खुलासा सिडको प्रशासनाने केला आहे.
सिडकोचे घर प्रधानमंत्री आवास योजनेमुळे स्वस्त दरात मिळेल या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांनी या योजनेत घरांसाठी अर्ज नोंदणी केली. २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेमध्ये २१,४०० अर्जदारांचे अर्ज आले होते. त्यापैकी १९,५१८ अर्जदार विजेते ठरले होते. प्रत्यक्षात १३,५१८ विजेते होते. परंतू सहा हजार अर्जदारांना सोडतीच्या संगणकीय प्रणालीव्दारे पसंतीचे घर नसतानाही पसंतीच्या घराजवळचा पर्याय सुचविला होता. त्यापैकी तीन हजार अर्जदारांनी पसंतीचे घर नसल्याने या प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान विजेत्यांना सिडकोने इरादा पत्र पाठविताच या मुद्दयावरुन नवा वाद सुरु झाला आहे. या इरादा पत्रात दिलेल्या घरांचे क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षात जाहिरातीमधील क्षेत्रफळात तफावत असल्याने ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जाहिरातीमध्ये ३२२ चौरस फुटाचा उल्लेख असलेल्या घराचे इरादापत्रात रेरा कायद्यानूसार २७.१२ चौरस मीटर क्षेत्रफळ दर्शविल्याने ३० चौरस फुटाच्या बाल्कनीच्या क्षेत्रफळाची किंमत मूळ चटई क्षेत्रफळाप्रमाणे सिडको आकारत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
सिडकोचे म्हणणे
सिडकोने जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न या घटकांतर्गत घटकातील वन बीचके घरांचे क्षेत्रफळ ३२२ चौ. फुट असल्याचे नमूद कराण्यात आले आहे. सदरचे क्षेत्रफळ हे बरोबर असून प्रत्यक्षात जागेवर (२९ चौ.मी.) घरांचे क्षेत्रफळ हे ३२२ चौ. फूट असेच आहे. या क्षेत्रफळामध्ये त्या घरात बाल्कनीचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे. प्रकल्पातील घरांची रेरामध्ये नोंदणी करताना रेरा चटई क्षेत्रफळामध्ये (२७.१२ चौ.मी) संबंधित दोन अंतर्गत बाल्कनीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात येत नाही. त्यामुळे विजेते अर्जदारांना सिडकोमार्फत वाटप करण्यात आलेल्या इरादापत्रात रेरा चटई क्षेत्रफळ (२७.१२ चौ.मी) नमूद करण्यात आले आहे, अशी भूमिका सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी मांडली.
संदीप नाईक आक्रमक
याप्रकरणी राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘सिडकोची महागृहनिर्माण योजना ‘माझे पसंतीचे घर’ २०२४ मध्ये सोडतीत विजेत्यांना मूळ जाहीर केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एलआयजी गटासाठी ३२२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सोडतीच्या निकालानंतर विजेत्यांना मिळालेल्या इरादा पत्रात सदनिकेचा रेरा क्षेत्रफळ २९१. ९१ चौ. फूट (२७.१२ चौरस मीटर) इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे, ही जागा मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास ३० चौरस फूट कमी आहे. सिडको प्रशासनाने गृहनिर्माण योजनेच्या मूळ माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या ३२२ चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाच लाभार्थ्यांना द्याव्यात. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या क्षेत्रफळापासून वंचित ठेवले जाणार नाही, याची खबरदारी सिडकोने घ्यावी.
घर परत करताना ऑफलाइन प्रक्रिया
ज्या विजेत्यांना घर रद्द करायची असतील, अशा विजेत्यांनी सिडकोकडे ऑफलाइन पद्धतीने घर परत करण्याची प्रक्रिया करण्याचे आवाहन सिडकोने केले आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि घर परत करताना ऑफलाइन प्रक्रिया ठेवल्यामुळे अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी विजेत्यांना आपला वेळ खर्च करुन सिडकोच्या दारी जावे लागणार आहे.