नवी मुंबई : सिडकोचे कंपनी सचिव प्रदीप रथ यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून सातत्याने मानसिक छळ होत असून याला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी संचालक मंडळाकडे पाठविलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.
सिडकोच्या मुंबई येथील कार्यालयात डॉ. मुखर्जी आणि रथ यांच्यात बुधवारी शाब्दिक वाद झाला. यात डॉ. मुखर्जी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप रथ यांनी केला आहे तर रथ यांनी आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचे डॉ. मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
सिडकोची स्थापना कंपनी कायद्यानुसार झाली आहे. राज्य सरकारने १९७० मध्ये केलेल्या चार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे सिडकोची भरभराट झाली असून गेली ५२ वर्षे हा कारभार सुरू आहे. त्यामुळे सिडकोत कंपनी सचिवाचे पद महत्त्वाचे मानले जाते. कंपनी सचिव प्रदीप रथ हे बुधवारी सिडकोच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांच्या दालनात सभेच्या इतिवृत्तांतावर सही घेण्यासाठी गेले असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. गेली अनेक दिवस डॉ. मुखर्जी यांच्याकडून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे रथ यांनी संचालक मंडळाकडे पाठविलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे. तर रथ यांच्याकडून अलीकडे वारंवार चुका केल्या जात होत्या. यापूर्वी त्यांची सिडकोतील इतर सनदी अधिकाऱ्यांबरोबरदेखील शाब्दिक चकमक झालेली आहे. महाराष्ट्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमालादेखील रथ अनुपस्थित होते. त्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांची वर्तणूक ही कंपनी सचिवाला शोभणारी नव्हती. त्यांनी या भेटीनंतर राजीनामा दिला असून त्याबद्दल संचालक मंडळ निर्णय घेणार असल्याचे डॉ. मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा