नवी मुंबई : सिडको महामंडळामधील ३२५ हून अधिक कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात त्यांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन १० मार्चला जमा झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सिडकोच्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ‘लोकसत्ता’ने त्यांची व्यथा मांडली होती. अजूनही २५ कामगारांना त्यांचे वेतन बँक खात्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे मिळू शकलेले नाही. सिडकोचा कार्मिक विभाग यावर लक्ष ठेऊन आहे.
सिडको महामंडळात लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी असे साडेतीनशेहून अधिक कामगार कंत्राटी तत्वावर काम करतात. कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच, हे सूत्र सिडकोने जोपासल्यामुळे गेल्या १२ ते १३ वर्षांपासून यातील अनेक कामगार सिडकोत काम करत आहेत. या कामगारांचे नेतृत्व मुंबई लेबर युनियन करते. युनियनच्या माध्यमातून १६ जानेवारीला पहिल्यांदा कंत्राटी कामगारांनी अर्धा दिवस काम बंद आंदोलन केले. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरी कामगारांचे प्रश्न अनुत्तरित राहिले. कंत्राटदाराने कामगारांचा अनेक महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केला नाही. वेळेवर वेतन मिळत नाही. मुंबई दुकाने बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे वेतन दिले जाते, राज्य वैद्यकीय विमा योजनेचे लाभ मिळत नाही, अशा समस्यांमुळे कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
आंदोलनानंतर मुंबई लेबर युनियनचे पदाधिकारी ॲड सुरेश ठाकूर, अनिल जाधव आणि सुजीत पाटील यांनी सिडकोच्या कार्मिक विभागाचे अधिकारी प्रमदा बिडवे यांची भेट घेतल्यावर या बैठकीत वेळेत वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, २८ फेब्रुवारी उजाडला तरी वेतन न मिळाल्याने कामगारांची व्यथा लोकसत्ताने ठळक प्रसिद्ध केली. या वृत्ताची सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर कार्मिक विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्या. अखेर जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन मार्चच्या सुरुवातीला दिले.
भविष्य निर्वाह निधीची रक्कमही जमा
कंत्राटदाराने थकविलेला भविष्य निर्वाह निधीच्या अंशदानातील काही रक्कम जमा केल्याचे चलनसुद्धा कंत्राटदाराने सिडकोकडे दिले आहे. परंतु कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातून अद्याप अंशदान जमा झाल्याचा संदेश मिळाला नाही.