नवी मुंबई : खारघर ते नेरूळ हा सागरी किनारा रस्ता तयार करण्याचे नियोजन सिडकोने केले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सिडकोने बेलापूर सेक्टर-१५ तसेच ११ परिसरातील नागरिकांनी लावलेल्या जवळजवळ ३० हजार झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याची शक्यता असून या परिसरात स्वत: लावलेल्या व निर्माण केलेल्या निसर्ग संपदेवर घाला घातला जाणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करत सिडकोचा तीव्र निषेध केला. नियोजित खारघर ते नेरुळ सागरी किनारा मार्गाच्या विरोधात मुख्यमंत्री, सिडको अधिकारी यांची भेट घेणार असून वेळ पडल्यास न्यायालयाचाही दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

सिडकोने याबाबत निविदा नोटीस प्रसिद्ध केली असून त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सिडकोने खारघर सेक्टर १६ जलमार्ग ते खारघर रेल्वेस्थानक येथून किल्ला गावठाण ते नेरुळ जेट्टीमार्गे निवासी भागापर्यंतचा रस्ता प्रस्तावित केला आहे. या सिडकोच्या सागरी किनारा मार्गाच्या निर्मितीमुळे २०१३ पासून बेलापूर सेक्टर ११, परिसरात १२ वर्ष लावलेल्या झाडांच्या मुळावर या कोस्टल रोडचे संकट ओढवले आहे. तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याच बेलापूर सेक्टर १५ येथील परिसरातून ‘वॉक विथ कमिशनर’उपक्रम सुरू करुन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आयुक्तांकडे थेट मांडण्याचा सुसंवाद सुरू केला होता. परंतु आता याच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सेक्टर १५ परिसरातील सौंदर्यावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा…प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय

बेलापूर सेक्टर ११ तसेच १५ परिसरात हजारो झाडे नागरिकांनी लावली,जोपासली आहेत. त्यामुळे या ३० हजार झाडांची निसर्ग संपदा व या विभागाचे सौंदर्य जपण्यासाठी रविवारी या विभागातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन या सागरी किनारा मार्गाला विरोध केला आहे. सेक्टर १५ वॉकर्स फाऊंडेशनच्या माद्यामातून मानवी साखळी करत सिडकोच्या व शासनाचा भूमिकेचा निषेध केला. यावेळी निषेधार्थ माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक तसेच संदीप नाईक, रामचंद्र दळवी, डॉ.जयाजी नाथ यांनी आंदोलनात सहभाग घेत सिडकोच्या नियोजनाचा निषेध केला.

दुसरीकडे नागरिकांनी नवी मुंबई महापालिकेला अंधारात ठेवून सिडको या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकल्पामुळे सीबीडी सेक्टर १५ परिसराचे सौंदर्य आणि शांतता नष्ट होण्याची भिती आहे. या परिसरातील ३० हजार झाडे मारली जाणार आहेत. त्यामुळे सिडकोच्या या कोस्टल रोडला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

हे ही वाचा…पनवेलमधील पाणी पुरवठा बंद

सिडकोने मनमानीपणे नियोजित केलेल्या या सागरी किनारा मार्गाला नागरिकांचा तीव्र विरोध असून सिडकोला मनमानी कारभार करू देणार नाहीत. पर्यावरणाचा ऱ्हास करून रहिवाशांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार सिडकोला कोणी दिला? – नेत्रा शिर्के, माजी नगरसेविका

विकासात्मक कामे करताना नव्याने विकसित झालेल्या विभागाला व परिसराचे सौंदर्य व नैसर्गिक संपदा नष्ट करुन प्रकल्प करत असतील तर त्याला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. – शुभांगी तिरलोटकर, सामाजिक कार्यकर्त्या

हे ही वाचा…बेलापूरात शिंदे-फडवणीसांना ‘बहिणी’ची साद; मंदा म्हात्रे ‘लाडक्या’ ठरतील का याचीच चर्चा अधिक

सिडकोच्या खारघर ते नेरूळ या कोस्टल मार्गाला नागरिक विरोध करत असतील तर याबाबत सिडको अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. – संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको

हे ही वाचा…‘वाढवण’साठी सर्वांत मोठे पॅकेज; प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

या प्रकल्पाला ‘वॉकर्स फाउंडेशन’च्या माद्यामातून आगामी काळात तीव्र विरोध करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोने रहिवाशी वस्तीतला हा प्रकल्प नागरिकांना व निसर्गाला बाधा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने करावा. – सी.डी. गुप्ता, सचिव,सेक्टर १५ वॉकर्स फाउंडेशन