पनवेल : अतिवृष्टीमध्ये उद्भवलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी सिडको महामंडळाने सालाबादाप्रमाणे नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये २४ तास या नियंत्रण कक्षातून रहिवाशांना मदत केली जाणार असल्याचे सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. या प्रसिद्धीपत्रकात सिडको महामंडळाने पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे, काळुंद्रे, तळोजा, कामोठे या वसाहतींचे हस्तांतरण झाल्याने या वसाहतींना वगळून इतर सिडको वसाहतींमधील नागरिकांसाठी सिडकोचे हे आपत्कालीन नियंत्रण कक्ष मदत करेल असेही स्पष्ट केले आहे.
सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन या इमारतीच्या तळ मजल्यावरुन आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे काम सुरू असणार आहे. सिडको मंडळाने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसोबत शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास हे कक्ष कार्यरत असणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग व इतर महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास रहिवाशांच्या संपर्कात असतील.
हेही वाचा…२० अवैध फलकांचे पनवेलमध्ये पाडकाम सुरू
आपत्तीवेळी नागरीकांनी काय करावेनागरिकांनी आपत्तीवेळी सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा. नागरीक दूरध्वनी किंवा व्हॉटसअॅप क्रमांकावर तसेच ई-मेलद्वारे नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील. दूरध्वनी क्रमांक – ०२२-६७९१८३८३/८३८४/८३८५, ०२२-२७५६२९९९व्हॉटसअॅप क्रमांक – ८६५५६८३२३८
फॅक्स क्रमांक – ०२२-६७९१८१९९ ई-मेल – eoc@cidcoindia.com
आपत्कालीन कक्षाची कार्यपद्धती वृक्षांची पडझड होऊन वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्यासाठी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते व नाल्याजवळ साचलेला कचरा, अतिवृष्टीमध्ये जलप्रवाहात नागरीकांची बुडण्याच्या ठिकाणी तसेच आगीची घटना घडल्यास, साथीचे रोग, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल हे पथक तातडीने घेईल. या मदतकक्षाकडे नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर मिळालेली माहिती नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने संबंधित नोडच्या प्रमुख अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात येईल. सिडकोचे वरिष्ठ अधिकारी त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करतील.
हेही वाचा…पनवेलच्या ‘इंटरनेट’ लेडीजबारवर पोलिसांची धाड
नियंत्रण कक्ष आवश्यक असल्यास अग्निशमन केंद्र, रुग्णालय, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचविण्याची तरतूद करतील. नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार असल्याचे सिडकोने कळविले आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित सिडकोचे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्वाची भूमिका हा नियंत्रण कक्ष पार पाडेल. त्या घटनेसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती व सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरवणार आहेत. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल.