प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी मिळण्याची शक्यता
सिडकोच्या महागृहनिर्मितीतील सोडतीत भाग्यवंत ठरलेल्या १३ हजार ७३८ ग्राहकांना त्यांची सर्व कागदपत्रे सादर करण्यास देण्यात आलेली मुदत आता मध्यंतरी आलेले दसरा, दिवाळीच्या सणांची रेलचेल लक्षात घेऊन आणखी आठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. या ग्राहकांनी आता २२ नोव्हेंबपर्यंत उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वास्तव्याचा दाखला आणि पंतप्रधान आवास योजनेसाठी कुटुंबाचे देशात कुठेही घर नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहेत.
पंतप्रधान आवास योजनेत व पत्रकार संवर्गात घर आरक्षित करणाऱ्या ग्राहकांना पुरावे सादर करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘सर्वासाठी घर’ या संकल्पनेत सिडको व मुंबईत म्हाडाचा सिंहाचा वाटा आहे. सिडकोने ५२ हजार घरांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील १५ हजार घरांचे बांधकाम आणि विक्री एकाच वेळी सुरू करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये या घरांच्या विक्रीला सुरुवात करण्यात आली, तर ऑक्टोबरमध्ये या घरांची सोडत काढण्यात आली. १४ हजार ८३८ घरांच्या या सोडतीत ११०० घरांना मागणी न आल्याने ती विक्रीविना आहेत. सिडको आणखी एक-दोन वेळा या घरांसाठी अर्ज मागवून प्रतिसाद न आल्यास ती इतर आरक्षणातील ग्राहकांसाठी विकण्याची शक्यता आहे.
२ ऑक्टोबरच्या सोडतीत भाग्यवंत ठरलेल्या ग्राहकांना त्यांच्या संवर्गातील घरांचे कादगपत्र सादर करण्याची मुदत १६ नोव्हेंबपर्यंत देण्यात आली होती. मागील व या महिन्यात आलेले दसरा-दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणांमुळे शासकीय कार्यालयांना लागोपाठ सुट्टय़ा लागल्या होत्या. त्यामुळे दाखले जमा करताना ग्राहकांची तारांबळ उडाली होती. हे लक्षात घेऊन सिडकोने ही कागदपत्रे सादर करण्यास ग्राहकांना आणखी एक आठवडय़ाची मुदतवाढ दिली आहे. घरासाठी ऑनलाइन अर्ज भरताना अनेक ग्राहकांनी ‘होय’ आणि ‘नाही’ या संक्षिप्त प्रश्नावलीत ‘होय’ उत्तरे दिलेली आहेत. त्यांचे पुरावे सादर करण्याची त्यांच्यावर जबाबदारी येऊन ठेपली आहे; पण हे पुरावे सादर न केल्यास त्यांचा अर्ज बाद ठरविला जाणार आहे. अशा वेळी रद्द झालेले घर त्याच संवर्गात व आरक्षित असलेले प्रतीक्षा यादीवरील ग्राहक दिलेल्या क्रमांकानुसार भाग्यवंत ठरणार आहेत. सोडत काढतानाच सिडकोने जेवढय़ा घरांची सोडत काढलेली होती तेवढेच ग्राहक हे प्रतीक्षा यादीवर निश्चित केले होते. त्यांना भाग्यवंत ग्राहकांच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे, मात्र ही संख्या तुरळक असणार आहे.
खोटी माहिती आढळून आल्यास घर रद्द
भाग्यवंत ग्राहकांना सोडतीत लागलेल्या घरासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जवळच्या ३५ एक्सेस व निर्धारित केलेल्या बँकेत सादर करण्याची मुभा सिडकोने दिलेली आहे. त्यांची छाननीदेखील बँकेच्या वतीने केली जात आहे. ग्राहकांनी सादर केलेल्या कागदपत्रे ही शासकीय अथवा निमशासकीय संस्थांकडून घेण्यात आली असल्याने त्यांची पुन्हा पडताळणी करण्याचा प्रश्न येणार नाही. ही सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे सत्य असल्याचे केवळ प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. त्यानुसार दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास ते घर रद्द केले जाण्याची शक्यता आहे. जात पडताळणीसाठी सिडकोने शिफारस पत्र दिलेले असून सर्व जिल्हय़ांच्या जात पडताळणीसाठी संकेतस्थळांवर नमुना पत्र सादर केलेले आहे.
कुठेही घर नसल्याच्या प्रमाणपत्राची अट
पंतप्रधान आवास योजनेसाठी देशात कुटुंबाच्या नावे कुठेही घर नाही असे प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. यात अनेक ग्राहकांची फसगत झालेली आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे सादर न करणाऱ्या ग्राहकांना हे प्रमाणपत्र सादर करताना पंचाईत झालेली आहे. आरक्षण तसेच सर्वसामान्य गटातील कागदपत्रे सादर न करणाऱ्या ग्राहकांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांनी संधी मिळणार आहे.
सिडकोच्या महागृहनिर्मितीतील भाग्यवंतांना इरादापत्र वाटप झालेले आहेत. त्यानंतर त्यांची कागदपत्रे व पुरावे सादर करण्याचे काम सुरू आहे. येत्या २२ नोव्हेंबपर्यंत हे काम सुरू राहणार असून कागदपत्रे सादर न करणाऱ्या ग्राहकांच्या त्या त्या संवर्गातील प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना त्यांच्या क्रमांकानुसार संधी दिली जाणार आहे.
– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको