सिडकोची उंच इमारतींसाठी अग्निशमन उद्वाहक यंत्रणाच नाही
पनेवल पसिरात उंच इमारतीत १५ मजल्यांवर दुर्दैवाने आग लागलीच तर ती आटोक्यात आणण्यासाठी सिडकोकडे अग्निशमन उद्वाहक यंत्रणाच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जानेवारीमध्ये खारघरमधील ‘गिरिराज’ इमारतीच्या १५ मजल्यावर सायंकाळी लागलेल्या आगीनंतर सिडको प्रशासनाने २० कोटी रुपये खर्चून ६८ मीटर उंचीवर आग विझविण्यासाठी हे यंत्र घेण्याचे मान्य केले होते; मात्र हे आश्वासन कागदावरच राहिले आहे.
सिडको खारघर आणि परिसरात २२ मजल्यांच्या उंच इमारती बांधण्यासाठी आणि त्यात राहण्यास परवानगी देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हे यंत्र लवकर येईल, असे म्हटले असले तरी हे यंत्र खरेदी केल्यावर पनवेल महापालिकेला हस्तांतरण करायला लागू नये म्हणून सर्व प्रयत्न सिडकोचे सुरू असल्याचे कळते.
खारघरच्या सेक्टर-२० येथील आगीच्या घटनेनंतर सिडकोमध्ये तातडीच्या बैठका झाल्या, सिडको मंडळाने घाईघाईने अशा उंचीवर आग लागल्यास कोणती उपकरणे, यंत्रे किती आणि कुठे मिळतील, याची चाचपणी केली. किमान १७ मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तरी ६८ मीटर उंचीवर जाण्यासाठीचे यंत्र २० कोटी रुपये खर्च करून मागविण्याचे ठरले होते.
सिडको वसाहतीमध्ये तळोजा, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथे सिडकोने टोलेजंग इमारती बांधण्यासाठी परवानग्या दिल्या. त्यापैकी सर्वाधिक उंच इमारती या खारघरमध्ये आहेत. मात्र ३२ मीटर उंचीपेक्षा वरील मजल्यावर आग लागल्यास सिडको प्रशासनाकडे ही आग विझविण्यासाठी जवानांना वरती घेऊन जाणारे एकही उद्वाहक यंत्र उपलब्ध नाही.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सिडकोचा विरोध असतानाही खारघर परिसर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट केल्याने सिडको प्रशासनाने अग्निशमन दलाच्या या उद्वाहक खरेदी प्रक्रिया लांबविण्याचा विचार सुरू झाला अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे. पालिकेत खारघरचा समावेश झाल्यामुळे २० कोटी रुपये उद्वाहक यंत्र खरेदीसाठी लावलेली रक्कम वाया जाईल, अशी भीती सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकारी व्यक्त करू लागले. परंतु ज्या विकासकांना २० ते २२ मजल्यांच्या इमारती बांधण्यासाठी परवानगी दिली. त्यांच्याकडून सिडकोच्या तिजोरीत जमा झालेल्या विकासनिधीतून सर्वसामान्यांच्या सुरक्षेची उपाययोजनांसाठी सिडकोने हे यंत्र तातडीने खरेदी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. सध्या ९० मीटर उंचीवरील इमारतीत आपत्कालीन परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाकडे उद्वाहक यंत्र आहे. त्याव्यतिरिक्त असे यंत्र अन्य कोणत्याही अग्निशमन दलाकडे नाही. सध्या सिडकोच्या अग्निशमन दलाकडे ३२ मीटर उंचीवर जाण्याची सोय असलेले उद्वाहक यंत्र आहे.
नवीन पालिकेच्या वाटेला..
सिडकोच्या अग्निशमन दलाकडे सध्या १३४ अधिकारी व जवान आहेत. सिडकोने नवीन केलेल्या जवानांच्या भरती प्रक्रियेमध्ये १०५ जवान नव्याने भरती होणार आहेत. एकूण २३९ पैकी व निम्म्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता महापालिकेला सुरुवातीला लागणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येणारी नवीन पनवेल, कळंबोली, खारघर हे अग्निशमन केंद्र आहेत. त्यासोबत पनवेल नगरपरिषदेचे नवीन बांधलेले केंद्र आहे. नवीन पनवेलमध्ये अग्निशमन करण्यासाठी ३ गाडय़ा, खारघर व कळंबोलीच्या केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन अग्निशमनाच्या गाडय़ा आहेत. या गाडय़ांमध्ये अग्निशमनासाठी अद्यावत साहीत्य सामुग्री आहे. सिडकोने कामोठे व तळोजा फेज २ येथे अग्निशमन केंद्रासाठी नवीन भूखंड आरक्षित ठेवले आहेत. त्याचेही हस्तांतरण पालिकेकडे लवकर होईल.