उरण : सिडकोकडून बोकडवीरा आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित साडेबारा टक्केचे भूखंड वाटप करण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आशा निर्माण झाली आहे. यासंदर्भात नुकताच सिडको भवन येथे एक बैठक झाली. या बैठकीत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यात प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाचे आश्वासन देण्यात आले आहे. या बैठकीला आजी माजी आमदार आणि विविध पक्षांचे राजकीय नेतेही उपस्थित होते.

मार्च १९९० मध्ये शासनाने सिडको प्रकल्पग्रस्तांना विकसित साडेबारा टक्के भूखंड देण्याचा शासन आदेश काढल्यानंतर ही उरण मधील शेकडो प्रकल्पग्रस्त आणि वारसांना गेल्या ३५ वर्षांपासून प्रतीक्षा आहे. उरण मध्ये द्रोणागिरी नोडची उभारणी केली जात आहे. यात साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप करण्यात येत आहे. मात्र २००८ मध्ये द्रोणागिरी नोडमधील भूखंडाचे इरादापत्र देण्यात आले होते. यातील अनेक प्रकल्पग्रस्त आजही भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत. तर अनेकांना पात्रताही मंजूर झालेली नाही. या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिले होते. जवळपास पाचशे पेक्षा अधिक प्रकल्पग्रस्तांचे भूखंड वाटपासाठी सिडकोच्या भूमी व भूमापन विभागाकडून भूखंड शोध मोहीमही राबविण्यात आली होती. मात्र या आश्वासनाची आज पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.

बोकडवीरा गाव व महसूल हद्दीतील अनेक प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे वारस यांना साडेबारा टक्के भूखंडाची प्रतीक्षा आहे. तसेच येथील भूमिपुत्रांचे प्रश्नही प्रलंबित आहेत. यासंदर्भात बैठकीत आश्वासन देण्यात आले आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. – भगवान पाटील, माजी सरपंच, बोकडवीरा ग्रामपंचायत

Story img Loader