लोकसत्ता टीम
पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प शिवडी-न्हावा शेवा सागरीसेतू महामार्ग (अटलसेतू) तसेच उरण खारकोपर रेल्वे मार्ग अशा विविध प्रकल्पांचा भव्य उदघाटनासाठी नवी मुंबईत येत आहेत. हा उदघाटन सोहळ्या भव्य होण्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे ठिकाण निवडण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच येथील जमिनीचे भाव गगणाला भिडतील.
नवी मुंबईतून २० मिनिटांत थेट मुंबई येथील शिवडी येथे वाहनांना जाता येणार असल्याने हा अटलसेतू मुंबई व नवी मुंबईकरांना अतिशय लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य उदघाटन सोहळ्यासाठी सिडको महामंडळाने सूमारे ७ कोटी ८८ लाख रुपयांची कामे हाती घेतली आहेत. याबाबतची बोलीपद्धतीची निविदा बुधवारी विविध वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आल्या आहेत. उदघाटन सोहळा होत असलेल्या विमानतळ प्रकल्पातील जागेवर प्रवेशव्दार आणि बाहेर जाण्याचा मार्ग तसेच अंतर्गत रस्ते बनविण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये आणि मैदान तयार करणे, मंडप बांधणे, वाहनतळाची सोय करण्यासाठी ५ कोटी २३ लाख रुपयांची कामे सिडको कंत्राटदारांच्या मार्फत करणार आहे. यासाठीची बोली पद्धतीने निविदा सिडको मंडळाने ठेकेदारांकडून ४ जानेवारीपर्यंत मागविल्या आहेत.
आणखी वाचा-मालवाहतूकीच्या संपाचा फटका, मटार महागला
अद्याप पंतप्रधान मोदी नेमके येणार कधी याची वेळ आणि दिवस निश्चित झालेला नाही. यापूर्वी सुद्धा सिडको मंडळाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटनासाठी विमानतळावर मंडप व मैदान बांधण्यासाठी निविदा प्रक्रीया राबविली होती. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारला विविध प्रकल्पांचे उदघाटन सोहळे आटपून घ्यायचे आहेत. यापूर्वी नवी मुंबई मेट्रोचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. परंतू पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांचा विचार करुन कोणत्याही सोहळ्याशिवाय सर्वसामान्यांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी नवी मुंबई मेट्रोची सेवा सुरु केली होती.