नवी मुंबई : सिडको महामंडळाने नवी मुंबईतील विविध नोडमध्ये २६ हजार घरांची सोडत प्रक्रियेतील घरांचे दर जाहीर केल्यानंतर अर्जदारांनी संताप व्यक्त केला. यासंदर्भात गुरुवारी सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाठ यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी घरांच्या किमती कमी करण्याची गरज असल्यास नक्कीच त्याचा पुन्हा विचार करु, असे आश्वासन दिले. तसेच सिडको नफा कमवणारी कंपनी नाही, असे विधान केले. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत दर निश्चित करताना सिडको अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का, असा प्रश्न आता अर्जदार उपस्थित करत आहेत.

तळोजातील घरे प्रदूषण आणि पाण्याच्या समस्येमुळे विक्री होत नसल्याने सिडको मंडळाने २६ हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेत तळोजातील विविध श्रेणीतील १०,५१८ घरे विक्रीसाठी काढली. प्रदूषण आणि पाण्याच्या समस्येमुळेच तळोजातील आर्थिक दुर्बल घटकासाठीचे वनबीएचके (३२२ चौरस फुट) घराचे दर २५ लाख ते २६ लाख आणि अल्प उत्पन्न गटाच्या श्रेणीतील ३४ ते ४६ लाखांचा दर विक्रीसाठी खुला केला आहे. मात्र अल्प उत्पन्न गटाच्या तळोजातील घर खरेदी करणाऱ्यांना मुद्रांक व नोंदणीशुल्क असे दोन ते अडीच लाख रुपये वरचे मोजावे लागणार आहेत. तसेच ज्या घरांची किमती ७४ लाख आहे अशांना ७९ लाख ५८ हजार आणि ९७ लाख रुपयांचे घर असणाऱ्यांना एक कोटी ४ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. प्रत्येक इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरासाठी अधिकचे १० रुपये चौरस फुटामागे आकारले जाणार आहे.

हे ही वाचा… परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्

सिडकोने काढलेल्या महागृहनिर्माणाच्या सोडत प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची घरे आहेत. यातील काही ठिकाण रेल्वेस्थानकांलगतची घरे असल्याने ही प्राईम लोकेशनच्या घरांची मागणी अधिक आहे. मात्र प्राईम लोकेशनच्या जागेची निवडही त्याचपद्धतीने केली आहे. काही ठिकाणी सध्याच्या बाजारभावातील खासगी विकसकापेक्षा अपसेट किमतीच्या २८ ते ३० टक्के कमी आहे. परंतु काही ठिकाणी घरांच्या किमती वाढल्या असतील तर त्याची मी माहिती घेणार आहे. सिडको ही नफा कमावणारी कंपनी नसून सर्वसामान्यांना घरे देणारी कंपनी आहे. म्हणून घरांच्या किमतीबाबत योग्य तो निर्णय घेऊ. शक्य असल्यास घरांच्या किमती कमी करण्याची गरज असेल तर कमी सुद्धा करु परंतू खासगी विकासकापेक्षा कोणतीही लपवाछपवी न करता सिडको कारपेट क्षेत्रात दर्शविलेले क्षेत्राचे घर सर्वसामान्यांना देते. खासगी विकसकाप्रमाणे लोडींग क्षेत्र घरांवर लादले जात नाही. – संजय शिरसाठ, अध्यक्ष, सिडको महामंडळ

Story img Loader