नवी मुंबई : सिडको महामंडळ २६ हजारांहून अधिक घरांची सोडत काढणार असून या सोडतीचा मुहूर्त दसऱ्याला म्हणजेच १२ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी निघण्याची शक्यता सिडकोच्या सूत्रांनी वर्तविलेली आहे. परंतु या सोडत प्रक्रियेमध्ये दक्षिण नवी मुंबईतील म्हणजे पनवेल परिसरातील सिडको बांधत असलेल्या महागृहनिर्माणातील घरे असल्याने वाशी, जुईनगर, सानपाडा इत्यादी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्थानकाजवळील आणि बसआगाराच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या घरांचा समावेश नसल्याने नवी मुंबईत घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे या सोडतीमध्ये हक्काच्या घरासाठी नशीब आजमवणाऱ्यांना खांदेश्वर पूर्व आणि पश्चिम तसेच मानसरोवर या रेल्वेस्थानकांसोबत तळोजा आणि पनवेल येथील घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती सिडको मंडळाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सिडको महामंडळाची २६,६६७ घरांसाठी सोडत प्रक्रिया काढण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या सोडतीची प्रक्रिया सूरू करण्यासंबंधी सर्व हालचाली सिडको मंडळात पुर्ण झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत निघावी यासाठी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट हे आग्रही आहेत. अजूनही मुख्यमंत्र्यांची वेळ सिडको मंडळाला मिळाली नाही. इच्छुकांना अर्ज नोंदणी करताना त्यांच्या आवडीच्या सदनिकेचा प्राधान्यक्रमाने १५ वेगवेगळे सदनिका निवडण्याचे पर्याय (विकल्प) सिडको मंडळ देणार आहे.
अशा पद्धतीचा हा पहिल्यांदाच प्रयोग सिडको करत आहे. सर्वाधिक सदनिका या तळोजा परिसरातील आहेत. इच्छुकांना अर्ज नोंदणी करताना त्यांच्या आवडीच्या गृहनिर्माण योजनेमधील सदनिका आणि मजले निवडण्याचा अधिकार सिडकोने दिला आहे. इच्छुकांना अर्ज कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ दिला जाईल. ३० ते ४२ लाखांपर्यंत दक्षिण नवी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गालगत, महामार्गालगत तसेच बस आगार आणि वाहनतळावर ही घरे असणार आहेत. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकारी प्रिया रातांबे यांच्याकडे संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.