जगदीश तांडेल
उरण: शहरातील सातत्याने होणाऱ्या वाढत्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उरण शहराला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम सिडकोने सुरू केले आहे. उड्डाणपुलाच्या कामात तुळई टाकण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पर्यायी मार्गाचे काम दृष्टिपथात आले आहे. या मार्गामुळे उरण शहरातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या बाह्यवळण रस्त्याला जोडणाऱ्या उरण नगर परिषदेच्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे.
उरण शहर हे सर्वात लहान शहर आहे. मात्र मागील ४० वर्षांत तालुक्यात मोठया प्रमाणात औद्याोगिक विकास झाला आहे. त्यामुळे नागरीकरणातही वाढ झाली आहे. १२ जानेवारीपासून पंतप्रधानांच्या हस्ते उरण ते नवी मुंबईदरम्यानची लोकलही सुरू झाली. परिणामी, शहरातील बाजारहाट करणारे नागरिक व त्यांच्या वाहनांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. तर दुसरीकडे बाजारातील व्यावसायिकांचीही संख्या वाढली आहे.
हेही वाचा >>>खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील हलगर्जीपणाबाबतच्या याचिकेची सूनावणी पुढील तारखेला
उरण शहरातील वाहतूककोंडी ही नित्याची बनली आहे. सध्या तर बाजारात नागरिकांना कोणत्याही वेळी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून सिडकोच्या माध्यमातून उरण पनवेल राज्य महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळून बाह्यवळण रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सिडकोने निधीही मंजूर केला आहे, मात्र अनेक परवानग्यांमुळे काम रखडले होते. या सर्व परवानग्या मिळाल्या असून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
उरण शहराला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे कार्यकारी अभियंता हनुमंत नहाने यांनी दिली आहे.उरण शहरातील वाहतूककोंडी आणि येथील महत्त्वाच्या नौदलाच्या शस्त्रागार, मोरा बंदर आणि तालुक्यातील सर्वात जुन्या ग्राइंडवेल (सेंट गोबेन) या व्हील बनविणाऱ्या कारखान्याला जोडणारा हा मार्ग आहे.