कळंबोली वसाहतीत १६ वर्षांनंतर सिडकोच्या अभियंत्यांकडून ‘शोधमोहीम’
शहरांचे शिल्पकार असे सिडको स्वत:ला म्हणवून घेते. शनिवारी पनवेल येथील एका महाविद्यालयाच्या इमारत उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिडकोचे नियोजन कसे काय चुकते, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर कदाचित कळंबोलीतील मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती देऊ शकेल. गेल्या १६ वर्षांत या मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती सोडाच, ती आहे की नाही, याचाही पत्ता सिडकोला ठाऊक नव्हता. सिडकोच्या तीन अभियंत्यांनी जुलैमध्ये मनावर घेतले आणि मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती झाली.
अधीक्षक अभियंता किरण फणसे, कार्यकारी अभियंता सुनील कापसे आणि साहाय्यक कार्यकारी अभियंता विनायक जानी यांच्या अथक प्रयत्नाने एक किलोमीटर लांबीच्या या वाहिनीतील २५ पैकी १३ चेंबर शोधून काढण्यात आले. वाहिनीची सफाई करताना ‘मेनहोल’मधून सिमेंटचे खांब, विटा, शौचालयाची भांडी, मोठय़ा प्रमाणावर राडारोडा, हेल्मेट, मोठे दगड असे ‘साहित्य’ बाहेर काढण्यात आले.
कळंबोली वसाहतीमधील सिंगसीटी रुग्णालयापासून ते रोडपाली येथील उदंचन केंद्रापर्यंत मलनिस्सारण वाहिनी आहे. दर पावसाळ्यात वसाहतीमधील सेक्टर १ ते ६ या परिसरात मल तुंबण्याचे प्रमाण वाढले होते. यासाठी सिडकोने बसवलेल्या पंपाद्वारे मलाचा उपसा थेट खाडीत केला जात होता. गेली १६ वर्षे बारमाही या पंपांचे भाडे व त्यावर देखरेखीसाठी नियंत्रक नेमण्यात आला होता. नागरिक आत्माराम कदम यांनी ही समस्या सिडकोकडे वारंवार मांडूनही त्याबाबत अधिकारी रस दाखवत नसत. कळंबोली वसाहत ही समुद्रसपाटीपेक्षा ३ मीटर खोल वसविली असल्याने अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सुटू शकत नाही असाही दावा केला होता. काही अधिकाऱ्यांनी १५ कोटी रुपये खर्च करून तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वसाहतीभोवती एक नाला बांधून घेतला होता. तरीही समस्या कायम होती.
मानवरहित सफाई
काही महानगरपालिकेंशी संपर्क साधून एक्रॉर्ड एजन्सी या कंपनीकडे ही वाहिनी स्वच्छ करण्यासाठी ७ जुलै रोजी काम दिले. जमिनीखालील ३० फूट खोल आणि १६ वर्षे बंद असलेल्या या मलवाहिनीमध्ये मिथेलसारखा घातक वायू निर्माण झाल्याने कंत्राटदार कंपनीने त्यांच्याजवळील अत्याधुनिक यंत्रणाने माणूस वाहिनीपर्यंत न पोहचता ही वाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. वर्षांनुवर्षे बंद असणाऱ्या हे मेनहोल शोधण्यापासूनची अभियंत्यांची मोहीम सुरू झाली. त्यानंतर या मेनहोलमधून सफाईचे काम सुरू झाले. अजूनही यंत्राद्वारे अनेक चेंबर रस्त्याखाली गाढले गेले आहेत. त्याचाही शोध सुरू आहे. जुलै महिन्यात समुद्रातील भरतीमुळे व पावसाचे प्रमाण अधिक होऊनही वसाहतीमधील तळमजल्याची मलवाहिनी तुंबली नाही.