रेल्वे स्थानकांतील नियम मोडणारी दुकाने सील करणार
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांत सुका खाऊ विकण्याची परवानगी असताना अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून गॅस वापरून पदार्थ तयार करणाऱ्या २४ व्यावसायिकांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. हे बेकायदा व्यवसाय ३० दिवसांत बंद न केल्यास दुकाने सील करण्यात येतील, पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे या नोटिसांत नमूद करण्यात आले आहे. अशा बेकायदा व्यावसायिकांचे अग्निसुरक्षा, उपाहार परवाने रद्द करण्यात यावेत, असे पत्र नवी मुंबई महापालिकेलाही देण्यात आले आहे. सिडकोच्या इस्टेट विभागाने ही माहिती दिली. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते.
नवी मुंबई शहरात रेल्वे व सिडकोने भव्य व देखणी स्थानके उभारली आहेत. त्यांपैकी वाशी ते बेलापूरदरम्यानच्या स्थानकांत सर्वाधिक बेकायदा व्यवसाय सुरू असल्यामुळे तेथील व्यावसायिकांवर प्रथम कारवाई करण्यात येणार आहे. १० स्थानकांतील गाळे १९९७-९८पासून भाडेकरारावर देण्यात आले असून त्यातील व्यावसायिकांची अनेक वर्षांपासून मनमानी सुरूच आहे. रेल्वे स्थानकांतील बेकायदा व्यवसायांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाने अनेकदा कारवाई केली आहे. मात्र कारवाईचा फार्स संपताच हे व्यवसाय पुन्हा सुरू होतात. सिडकोने उभारलेल्या स्थानकातील गाळ्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टी करू नयेत या बाबतची नियमावली आहे. मात्र ही नियमावली सर्वच स्थानकांत पायदळी तुडवण्यात आली आहे. कार्यालयासाठी गाळा खरेदी करून त्यात मद्यविक्री दुकाने, बार, हॉटेल चालवण्यात येत आहेत. अनेक स्थानकांत गाळ्याबाहेरच्या जागेत टेबल-खुच्र्या लावून व्यवसाय सुरू आहेत. नेरुळ स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी जिन्याजवळची जागाच गिळंकृत केली आहे. सानपाडा स्थानकातही जागा बळकावल्या आहेत. स्थानकात आगीची किंवा सिलिंडरच्या स्फोटाची कोणतीही दुर्घटना घडल्यास या अतिक्रमणांमुळे मदतकार्यात अडथळा येण्याची भीती आहे. त्यामुळेच सिडकोने दुकाने सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
२४ व्यावसायिकांना सिडकोने नोटिसा बजावल्या असून त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत नियमांची पूर्तता न केल्यास गाळे सील करण्यात येतील आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. पालिकेलाही याबाबत पत्र दिले आहे.
– डी. एस. चौरे, इस्टेट विभाग, सिडको
रेल्वेस्थानकांमधील व्यवसायांसाठी आवश्यक परवानग्या न घेतलेल्या किंवा नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येईल. अग्निसुरक्षेबाबत कडक निर्बंध घालण्यात येतील.
– प्रभाकर गाडे, अग्निशमन विभाग, नवी मुंबई महापालिका