नवी मुंबई राज्य सरकारने अवघ्या ४० दिवसांपूर्वी सिडको महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी राहुल कर्डिले यांची बदली केली होती. मात्र मंगळवारी राज्यभरातील विविध सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीत पुन्हा एकदा राहुल कर्डिले यांना सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावरुन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नेमल्यामुळे सिडको सह व्यवस्थापकीय संचालक पदाची खुर्ची पुन्हा एकदा रिक्त झाली आहे.

राज्य सरकारच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्या पदावर कर्डिले यांची बदली केली होती. कर्डिले यांनी सिडकोचा पदभार स्विकारल्यानंतर सिडको कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेतल्याने या प्रश्नावर खरेच काही मार्ग निघेल असा विश्वास कर्मचाऱ्यांच्या संघटनेला वाटू लागला होता. मात्र कर्डिले यांची सहव्यवस्थापकीय संचालक पदावरुन मंगळवारी अचानक बदली झाल्यामुळे आता या जागी कोणते अधिकारी येणार याकडे सिडको कर्मचारी संघटनेचे लक्ष लागले आहे.

Story img Loader