नवी मुंबई : सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी (ता.१९) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते चार या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शनिवारी ही सोडत होणार असे सिडकोने जाहीर केले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोने २६ हजार घरांच्या सोडतीसाठी शनिवार (ता.१५) निवडला होता. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवर पाठविले होते. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोने सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी ही सोडत यशस्वी करण्यासाठी रंगीत तालिम सुद्धा सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल यांच्या उपस्थितीत तळोजा येथे घेण्यात आली. सोडतीची पूर्वतयारी झाली असताना सुद्धा अचानक सोडत पुढे ढकलल्यामुळे अर्जदार आश्चर्य व्यक्त करत होते.  मागील वर्षी (१२ ऑक्टोबर) दस-याच्या मुहूर्तावर सिडकोने २६ हजार घरांसाठीची सोडत प्रक्रियेला सुरूवात केली. तब्बल १ लाख ६० हजार नागरीकांनी या योजनेसाठी अर्ज भरले.

संकेतस्थळावर कागदपत्रांची जमवाजमव केल्यानंतर घरांच्या किंमती जाहीर करण्यासाठी सिडकोने दोन महिन्यांचा काळ लावला. त्यानंतर २५ लाख ते १ कोटी ५ लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती जाहीर केल्याने आर्थिक दुर्बल घटक आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना या किमती परवडणा-या नसल्याने १ लाख नागरिकांनी अर्जाचे शुल्क भरणे पसंत केले नाही. उरलेल्या ६० हजार अर्जदारांपैकी अवघ्या २१ हजार ५०० अर्जदारांनीच अर्ज शुल्कासह अनामत रक्कम भरली. तब्बल १ लाख ३८ हजार ५०० अर्जदारांनी या सोडतीला पाठ दाखविली. सोडत प्रक्रियेसाठी तब्बल चार महिन्यांचा काळ लागल्यामुळे सिडकोच्या कारभाराविषयी अर्जदारांची समाजमाध्यांवर संताप व्यक्त केला. अखेर सिडकोने शिवजयंतीच्या दिवशी बुधवारी (ता.१९) सोडतीची तारीख निश्चित केली असली तरी सोडत तळोजा वसाहतीमधील फेज १, येथील सेक्टर २८ येथील रायगड इस्टेट येथे होईल की सिडको भवनातील सभागृहात हे अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र बुधवारी सोडतीचे थेट प्रेक्षपण तळोजा (खारघर पूर्व) सेक्टर ३७ भूखंड क्रमांक १४ आणि खांदेश्वर येथील सेक्टर २८, भूखंड क्रमांक एक (खांदेश्वर रेल्वेस्थानक लगत) तसेच खारघर सेक्टर १५ भूखंड क्रमांक ६३ अ येथील अनुभव केंद्रांवर अर्जदारांना पाहता येईल.