नेरुळमधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता सुरुवात; ऑनलाइन प्रक्षेपण पाहता येणार
नवी मुंबई : सिडकोच्या बहुचर्चित दोन लाख महागृहनिर्मितीतील पहिल्या टप्प्याच्या ९५ हजार घरांपैकी दहा हजार घरांची मंगळवारी नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी दहा वाजता सोडतीला सुरुवात होणार आहे. या दहा हजार घरांसाठी एक लाख दोन हजार अर्ज आले आहेत. यातील ८१० घरे ही ऑगस्ट २०१४ मधील स्वप्नपूर्ती या गृहसंकुलातील शिल्लक घरे आहेत.
राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने महागृहनिर्मितीचा सपाटा लावला आहे. येत्या पाच वर्षांत दोन लाख घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यातील ९५ हजार घरे बांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील दहा हजार ५९ घरांची सोडत मंगळवारी होत असून यात ८१० घरे ही जुनी तयार घरे आहेत. बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयात संविधान दिनाचा कार्यक्रम असल्याने ही सोडत सिडकोच्या नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात होणार आहे.
यासाठी माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या समक्ष ही सोडत होणार असून यावेळी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे उपसंचालक मोईस हुसेन उपस्थित राहणार आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या या महागृहनिर्मितीतील ९२४९ घरांपैकी ७९०५ घरे ही महागृहनिर्मितीतील आहेत, तर १३४४ घरे ही गेल्या वर्षीच्या गृहप्रकल्पातील आहेत. स्वप्नपूर्तीमधील शिल्लक ८१० घरे देखील विक्रीस काढण्यात आली असून त्यांची सोडत सोबत आहे.
या ८१० घरांपैकी १९५ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ आणि ६१५ घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी राखीव आहेत. राज्यात सत्ता स्थापनेचा सुरू असलेला प्रयोग व २६/ ११ शहीद दिनामुळे राज्यात वातावरण तंग असून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. याच वेळी सिडकोच्या दहा हजार घरांच्या सोडतीसाठी सोमवारी रात्रीपासूनच आगरी-कोळी भवनात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सिडकोच्या सिडको ड्रॉ २०१९ या संकेतस्थळावरही सोडतीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे मोजक्या ग्राहकांना आमंत्रण असेल.