भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आणि कडक शिस्तीचे सनदी अधिकारी अशी प्रतिमा असलेले सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष संजय भाटिया यांच्या माणुसकीचे असेही एक दर्शन सिडकोतील शेकडो कर्मचाऱ्यांना नुकतेच झाले. आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या भाटिया यांनी मृत्यूबरोबर झुंज देणाऱ्या सिडकोतील एका कर्मचाऱ्याला तीन लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत करून या कर्मचाऱ्याचे प्राण वाचविण्यास सहकार्य केले. त्यामुळे भाटिया यांच्याबद्दल सिडकोत एक जिव्हाळा निर्माण झाला आहे. सिडकोच्या भूमी विभागात काम करणाऱ्या अनंत देशमुख यांचे लिव्हर (यकृत) काही दिवसांपूर्वी निकामी झाले. देशमुख यांना तीव्र कावीळ झाल्याने त्याचा परिणाम यकृतावर झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना मुंबई (परळ) येथील ग्लोबल रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यकृत निकामी झाल्याने देशमुख यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली होती. त्यामुळे ते बदलण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यासाठी येणारा खर्च हा तीस लाखापर्यंत असल्याने देशमुख यांच्या नातेवाईकांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. त्यात यकृत देणारा दाता सापडणे आवश्यक होते. याचवेळी औरंगाबाद येथे अपघातात मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीचे असे यकृत देण्याची तयारी त्याच्या नातेवाईकांनी दाखविली. त्यामुळे पैशाची जमवाजमव करण्याची जबाबदारी देशमुख यांच्या नातेवाईकांवर आली. त्या प्रयत्नाला पहिला हात सिडकोने दिला. सिडकोतील कामगार संघटनेने ही बाब व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना सांगितली. अशा गंभीर आजारात सिडकोचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मर्यादा तीन लाखापर्यंत आहे. ही मर्यादा जास्तीत जास्त सहा लाखापर्यंत वाढवली जाऊ शकते. सिडकोच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधांची तरतूद करण्यात आली आहे, मात्र देशमुख यांना लागणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम जास्त असल्याने भाटिया यांनी क्षणाचा विचार न करता प्रथम दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आदेश लेखा विभागाला दिले. दहा लाखाच्या या आर्थिक मदतीत मित्रमंडळीसह नातेवाईकांनी भर टाकून देशमुख यांना नवीन जीवदान दिले आहे. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, हे केवळ भाटिया यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे झाल्याचे कामगार संघटनेचे सचिव जे. टी. पाटील यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या प्रति प्रेम आणि जिव्हाळा असल्यानंतर एखादा सनदी अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून एखाद्याला नवसंजीवनी देऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा