सिडको वसाहतींमधून जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती मिसळण्याच्या प्रकारामुळे झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याला ‘लोकसत्ता’ने ८ डिसेंबरला वाचा फोडली होती. सिडको प्रशासनाने या वृत्ताची दखल घेतली असून दक्षता विभागाच्या मुख्य अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे या घोटाळ्याची चौकशी करण्याचे काम सोपवले आहे. येत्या आठवडाभरात हा चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना सरवदे देणार आहेत.
सिडको वसाहतींमधील कचरा उचलून तो तळोजा येथील कचराभूमीत नेण्यासाठी प्रति टन १ हजार १६० रुपये तर माती (डेब्रिज) नेण्यासाठी प्रति टन २०० रुपये एवढा दर निश्चित झाला आहे; परंतु सिडको वसाहतीमधील कचरापेटय़ांतून कचरा उचलल्यानंतर या कचऱ्याच्या गाडीत माती भरली जात होती. वसाहतीमधील जागरूक नागरिक आणि प्रस्तुत प्रतिनिधीने कचऱ्यामध्ये माती मिसळली जात असतानाचे चित्रीकरण केल्यानंतर हा घोटाळा उजेडात आला. यानंतर ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे सिडकोत खळबळ उडाली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, तसेच कचऱ्याची वाहतूक करणारी बीव्हीजी कंपनी दोषी आढळल्यास त्यांचा करार रद्द करण्यात येईल आणि याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco officials also involved in waste scam