शहरातील पुनर्विकास व ठाण्यातील समूह विकास योजनेअंतर्गत राखीव घरांची विक्रीही सिडकोकडून होण्याची शक्यता
नवी मुंबई : महागृहनिर्मितीचा संकल्प सोडलेल्या सिडको महामंडळाच्या वतीने एक लाख १० हजार घरे विविध २७ ठिकाणी बांधली जाणार असून या घरांच्या व्यतिरिक्त सिडकोच्या ताब्यात शहरातील पुनर्विकास व ठाण्यातील समूह विकास योजनेअंतर्गत आणखी सव्वा लाख घरे मिळण्याची शक्यता आहे. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक लाख घरे दुसऱ्या टप्प्यात बांधली जाणार आहेत. त्यामुळे सिडको येत्या काळात दोन लाख घरे बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिडको विविध नोडमध्ये बांधणार असलेल्या घरांवर ३२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. यात पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी २७ हजार कोटीची तरतूद आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्वासाठी घर या योजनेअंतर्गत सिडकोने पंतप्रधान आवास योजनेसाठी ८७ हजार घरांची योजना आखली आहे. याशिवाय अल्प उत्पन्न गटासाठी २३ हजार ३३७ घरे बांधली जात आहेत. मागील साडेतीन वर्षांत सिडकोने २४ हजार घरांची सोडत काढली असून यातील सर्व रक्कम भरलेल्या सात हजार लाभार्थीना घरांचा प्रत्यक्षात ताबा दिला आहे. सिडको स्थापनेपासून ५० वर्षांत सिडकोने जेमतेम एक लाख ३५ हजार घरांची उभारणी केली आहे मात्र मागील तीन वर्षांत दोन लाख घरांचे लक्ष ठेवण्यात आले आहे.या घरांच्या साठय़ाबरोबरच सिडकोला नवी मुंबईतील पुनर्विकास व समूह विकास योजनेअंतर्गत घरे विकासकांना सिडकोकडे सुपूर्द करावी लागणार आहेत. नवी मुंबईतील सर्व जमीन ही सिडको मालकीची आहे. त्यामुळे या जमिनीवरील पुनर्विकास व समूह विकासात सिडकोचा क्षेत्रफळ स्वरूपात हिस्सा राहणार आहे. ग्रामीण भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी नगरविकास विभागाने प्रकल्पग्रस्तांची घरे जैसे थे स्थितीत कायम करताना गावठाणाबाहेर वाढलेल्या बेकायदेशीर बांधकामांसाठी समूह विकास योजना राबवली जाणार आहे. हा प्रस्ताव नगरविकास विभागाने मंजूर केला आहे. त्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब होणे अद्यााप बाकी आहे. या ग्रामीण विकासासाठी लागू करण्यात येणाऱ्या समूह विकास योजनेत २० ते २५ हजार घरे तयार होणार असून ती सिडकोकडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय ठाणे येथील किसन नगर भागात सिडको पालिकेबरोबर समूह विकास योजना राबवीत आहे. त्या ठिकाणीही घरे मिळणार आहेत.
महागृहनिर्मितीचा आराखडा
- नवी मुंबई क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्यात आर्थिकदृष्टया दुर्बळ व अल्प उत्पन्न गटासाठी एक लाख घरे बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
- महामुंबई क्षेत्रात उभ्या राहणारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे नवी मुंबईतील लोकसंख्या झपाटयाने वाढणार असल्याने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी महागृहनिर्मितीचा हा आराखडा तयार केला आहे.