जयेश सामंत, संतोष सावंत
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ प्रकल्पास लागूनच तिसरी मुंबई म्हणून विकसित केल्या जात असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रात (नैना) रस्ते तसेच दळणवळणासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करणाऱ्या सिडको प्रशासनाने याच भागात अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी सूचिबद्ध असा आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नेरुळ-उरण मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक ते आंबिवली असा १९ किलोमीटर तर कळंबोली-चिखले-कोनपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग विकसित करता येऊ शकतो का याची चाचपणी करण्यासाठी सिडकोने एका अभ्यासगटाची स्थापना केली आहे. याच अभ्यासगटामार्फत भविष्यात याच भागात वाहतुकीचे आणखी काही पर्याय आखता येतात का याविषयीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रालगत सिडकोने तिसरी मुंबई वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे क्षेत्रफळ ५६१ चौरस किलोमीटर इतके असून हे नवे शहर ११ टप्प्यांत विकसित केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा सेतू प्रवासासाठी खुला करण्यात येणार आहे. या सागरी सेतूच्या पायथ्याशी असलेल्या गावांमधून महानगर प्राधिकरणाने आणखी एक लहानसे शहर वसविण्याचा प्रकल्प आखला असून त्यास राज्य सरकारची मंजुरी अपेक्षित आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ पैकी ८० गावे वगळण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून मुंबई प्रदेश प्राधिकरणाकडे या गावांचा विकास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा… नवी मुंबई : साठवलेले पैसे चोरण्यासाठी हत्या, तिघांना अटक
राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून विमानतळाच्या आसपास टप्प्याटप्प्याने छोटी शहरे उभारण्याची प्रक्रिया या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या संपूर्ण टप्प्याला मोठे महत्त्व मिळणार असून येथील लोकसंख्या जुन्या नवी मुंबईच्या तुलनेत काही पटीने वाढेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
पहिल्या टप्प्यात तारघर रेल्वे स्थानक ते अंबिवली असा १९ किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास केला जाणार आहे. हा प्रकल्प नवी मुंबई विमानतळ प्रकल्पास जोडता येईल का याचाही अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय कळंबोली-चिखले-कोन (एनएच ४ महामार्ग) हा मार्ग सिडकोच्या तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर ( मेट्रो लाइन २), पेणधर ते एमआयडीसी तळोजा (मेट्रो लाइन ३) या मेट्रो मार्गांना जोडता येईल का याचाही अभ्यास केला जाणार आहे. याशिवाय कळंबोली-चिखले-कोन मार्गावरून कल्याण-तळोजा नियोजित मेट्रो मार्गाची जोडणी करून वर्तुळाकार मेट्रोची आखणी करणे शक्य होईल का हादेखील या अभ्यासाचा एक भाग असेल, अशी माहिती सिडकोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना दिली.
हेही वाचा… नवी मुंबई : मंदिराची दानपेटी आणि पादुका चोरीला
कळंबोली-चिखले-कोन हा मेट्रो मार्ग ‘नैना’ प्रकल्पाशी संलग्न असेल असे नियोजन आहे. नैना प्रकल्पात आखण्यात आलेले हे दोन्ही मेट्रो प्रकल्प विमानतळ अधिसूचित क्षेत्रातील नव्या शहराला नवी मुंबई महापालिका क्षेत्र तसेच पनवेल महापालिका क्षेत्राशी जोडणारे ठरू शकतील अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे. यासंबंधी वेगवेगळ्या आराखड्यांवर तसेच आणखी काही वाहतूक पर्यायांचा विचारही केला जाऊ शकतो, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मेट्रो मार्गांचा पनवेलकरांनाही फायदा
विशेष म्हणजे नैनाच्या या परिवहन अहवालामध्ये नैना क्षेत्रासोबत पनवेल शहर आणि नवीन पनवेल या वसाहतींमधील प्रवाशांना मेट्रोचा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पनवेलमधील नवीन पनवेल, पनवेल बस आगार, पनवेल औद्याोगिक वसाहत, कर्नाळा स्पोर्टस अकादमी येथून ही मेट्रो मार्गिका नवी मुंबई विमानतळ आणि उलवेपर्यंत जाणार आहे.