नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘२०२२ पर्यंत सर्वासाठी घरे’ या योजनेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सिडकोने नुकतीच ९५ हजार घरांच्या निर्मितीची घोषणा केली असताना आणखी एक लाख १० हजार घरांच्या बांधणीचा संकल्प संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे सिडको एकूण दोन लाख ५ हजार घरे बांधणार आहे.

गेल्या वर्षी सिडकोने १४ हजार ७३८ घरांसाठी सोडत काढली होती. या प्रकल्पातील घरांच्या बांधकामांना सुरुवात झाली आहे. बांधकाम आणि विक्री हे तत्त्व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम सिडकोत राबविले आहे.

यापूर्वी सिडको घरे पूर्ण बांधून विकत होती. त्यामुळे ग्राहकांना बँकांचा हप्ता भरताना आर्थिक भरुदड पडत होता. या १४ हजार ७३८ घरांची सोडत झाल्यानंतर सिडकोने यंदा थेट ९५ हजार घरांची घोषणा केली आहे. त्यांची ऑनलाइन नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली आहे.  सिडकोने आणखी १ लाख १० हजार घरे बांधण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे सिडको एकूण २ लाख ५ हजार घरांची निर्मिती करणार आहे.

विशेष म्हणजे ही घरे पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांतील गावाशेजारी बांधली जाणार आहेत. सिडकोने नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी १९७० मध्ये येथील शेतकऱ्यांची जमीन एका अध्यादेशाने संपादित केली. त्या जमिनीचे वेळीच संरक्षण न केल्याने लाखो बेकायदा बांधकामे या सिडको संपादित जमिनीवर झालेली आहेत. ती कायम करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. सिडकोने उशिरा का होईना, या आपल्या मालकीच्या जमिनीवर आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.