लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : खारघर उपनगरातील घरांच्या किमती कोटी रुपयांवर पोहचल्या आहेत. मात्र अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. मोठ्या गृहनिर्माण संस्थांना टँकरने पाणी खरेदीसाठी महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत असल्याने उन्हाळ्यात खारघरवासी हैराण झाल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. यानंतर सिडको मंडळाच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतलेल्या विविध कामांची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिली असून सिडकोने पाणी पुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनाचा तपशील मांडला आहे. पुढील चार महिन्यानंतर (जुलैपर्यंत) पाण्यासाठी हाती घेतलेल्या विविध योजनेचे काम पूर्ण होणार असून संबंधित योजनेतून जादा पाणी खारघरवासियांना मिळेल, असा दावा सिडकोने केला आहे.
खारघर उपनगरामधील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सिडकोमार्फत हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमध्ये दिघाटी गावाजवळील दाबरोधक यंत्रणेच्या ( ब्रेक प्रेशर टॅंक) पर्यायी व्यवस्थेचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच गणपतीवाडी ते तरणखोप दरम्यान भोगेश्वरी नदीलगत असलेली १५०० मि.मी. व्यासाची सिमेंट काँक्रिट जलवाहिनी बदलून १८०० मि.मी. व्यासाची एम.एस. जलवाहिनी बसवली जात आहे. हे काम जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर खारघर शहराला दररोज १० ते १५ दश लक्ष लीटर (एमएलडी) जादा पाणी मिळेल.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पाणी पुरवठा विभागाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दोन आठवड्यांत कामाच्या प्रगतीचा आढाव्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागासाठी अधीक्षक अभियंता पी.एम. शेवतकर यांच्या अभियांत्रिकी विभागाच्या देखरेखीखाली ही कामे सुरू आहेत.
प्रतिदिन दीडशे टँकर
सध्या खारघर उपनगरासाठी ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. मात्र दररोज ३ एमएलडी पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी सिडको रहिवाशांना मागणी तपासून टँकरने पाणीपुरवठा करते. खारघरमध्ये प्रतिदिन दीडशे टँकरच्या फेऱ्यांमध्ये पाणीपुरवठा होतो.
खारघर उपनगरासाठी सिडकोने पाणी पुरवठा वाढविण्यासाठी अनेक कामे हाती घेतली आहेत. ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. ही कामे पूर्ण होताच खारघरवासियांना नियमित पाणीपुरवठा मिळू शकेल. यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. -प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ