नवी मुंबई : निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी अपुरे दिवस सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांना मिळाल्याने एक दिवसाआड सिडको भवनात येऊन शिरसाट नागरिक व ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकत आहेत. मी फक्त अर्ज स्वीकारण्यासाठी अध्यक्ष झालेलो नाही, असे सांगत शिरसाट यांनी लवकरच सिडको भवनात ‘जनता दरबार’भरवून नागरिकांच्या तक्रारी आणि निवेदनांवर सिडको प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.

शिरसाट हे शिवसेनेचे सिडकोच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले नेते आहेत.

चार वर्षांपासून सिडकोचे अध्यक्षपद रिक्त होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या अध्यक्षपदावर त्यांचे निकटवर्तीयांपैकी एक असणाऱ्या शिरसाट यांची वर्णी लावून ठाणे व रायगड जिल्ह्यांपेक्षा मराठवाड्याला ही संधी दिली. सिडकोचा पदभार घेतल्यावर शिरसाट यांनी पहिल्याच दिवशी मी निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे सांगत अध्यक्षपदावर काम करताना इतरांपेक्षा पुढे जाऊन नवी मुंबईकरांच्या समस्या सोडविणारा अध्यक्ष होईन, अशी घोषणा केली. पहिल्या दिवशीच अध्यक्ष शिरसाट यांनी सिडकोची संचालक मंडळाची बैठक मुंबईला निर्मल भवन येथे घेण्याची परंपरा मोडीत काढून ही बैठक बेलापूर येथील सिडको भवनात घेतली. या बैठकीत ऐरोली येथील ३० हेक्टर जमीन विकासकाला देण्यासंदर्भातील वादग्रस्त विषयाला स्थगिती देऊन सुटसुटीत आणि सिडको मंडळाचा या प्रकल्पामुळे काय लाभ होईल याचे पुनर्सादरीकरण करण्याची टिप्पणी नोंदवत संबंधित प्रस्ताव पुढील बैठकीत मांडण्याची सूचना केली.

हे ही वाचा…करंजा टर्मिनलवर रोजगारासाठी स्थानिक भूमीपुत्राचा एल्गार, उरण पनवेल लॉरी मालक संघाच्या वाहनांना काम देण्याची मागणी

एखाद्या नागरिक किंवा नागरिकांच्या समूहाने निवेदन दिल्यास त्यावर सिडकोकडून केलेल्या कार्यवाहीचे उत्तर जनता दरबारात दिले जाईल. काही प्रश्नांसाठी सिडको संचालक मंडळातही त्या विषयांवर निर्णय घेता येतील. नागरिक त्यांचे निवेदन ‘सिडको अध्यक्ष जनता दरबार’ या मथळ्याखाली सिडको भवनात देऊ शकतील. मी त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. – संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको